IPL 2026: दिल्ली की मुंबई आतापर्यंत कोणाचे पारडे जड? जाणून घ्या 'हेड-टू-हेड' रेकॉर्ड

आयपीएल २०२६ मध्ये आज (शनिवार, ४ एप्रिल) दोन सामने खेळले जाणार आहेत. यामधील पहिला सामना दिल्ली कॅपिटल्स (डीसी) विरुद्ध मुंबई इंडियन्स (एमआय) असा आहे. १९ व्या आयपीएल हंगामातील हा आठवा सामना दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर खेळला जाणार आहे. दोन्ही संघांनी या हंगामात त्यांचे पहिले सामने जिंकत विजयी सुरूवात केली आहे. यामुळे दुसऱ्या सामन्यातही हाच प्रयत्न असणार आहे.

मुंबईने कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध २२१ धावांचा पाठलाग करताना तो सामना ६ विकेट्सने जिंकला. दुसरीकडे दिल्लीने लखनऊ सुपर जायंट्सला ६ विकेट्सने पराभूत केले आहे. दोन्ही संघांमधील हेड-टू-हेड रेकॉर्ड पाहिले तर पारडे स्पष्टपणे मुंबईच्या बाजूने झुकलेले दिसते. आतापर्यंत या दोन संघांमध्ये झालेल्या ३७ सामन्यांपैकी मुंबईने २१ आणि दिल्लीने १६ सामने जिंकले आहेत. मागील हंगामात झालेल्या दोन्ही सामन्यातही मुंबईचाच संघ जिंकला होता.

या सामन्याआधी मुंबईला एक चांगली बातमी मिळाली, मिचेल सॅंटनर संघात सामील झाला आहे. हा अष्टपैलू खेळाडू दिल्लीविरुद्धच्या या सामन्यासाठी उपलब्ध होण्याची दाट शक्यता आहे. तसेच सॅंटनर खेळला तर अल्लाह गझनफरला बाकावर बसावे लागेल. आजच्या सामन्यात दिल्लीचे फलंदाज आणि मुंबईचे गोलंदाज असे समीकरण असणार आहे.

आपल्या मागील सामन्यात दिल्लीची वरची फळी लवकरच कोसळली होती. केएल राहुल तर पहिल्याच चेंडूवर बाद झाला होता. तसेच पथुम निसांका आणि नितीश राणा हे पण पॉवरप्लेमध्येच विकेट्स गमावून बसले होते. त्यामुळे मुंबईच्या जसप्रीत बुमराह आणि ट्रेंट बोल्ट यांचे त्यांना आव्हान असणार आहे, ते कसे पार करतात हे पाहणे चुरशीचे ठरेल.

घरच्या मैदानावर दिल्लीची कामगिरी मुंबईविरुद्ध चांगली आहे. खेळलेल्या १३ पैकी ७ सामन्यात दिल्लीने विजय मिळवला आहे. ६ सामने गमावले असून त्यामध्ये प्रगती करण्याचा प्रयत्न दिल्लीचा असणार आहे, मात्र मुंबईचे सलामीवीर रोहित शर्मा आणि रायन रिकल्टन यांचे आव्हान असणार आहे. दोघांनी कोलकाताविरुद्ध पहिल्या विकेटसाठी १४८ धावांची भागीदारी करत संघाचा विजय सोपा केला होता. दिल्लीच्या गोलंदाजांनी जसे लखनऊच्या फलंदाजांना रोखले तसेच ते आज करणार का हे कळेलच.

Comments are closed.