IPL 2026 – जोस बटलरचा नवा विक्रम; टी-20 क्रिकेटमध्ये कॅरेबियन खेळाडूंच्या सिंहासनाला दिला धक्का

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

IPL 2026 मध्ये आज (8 एप्रिल) दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यात थरारक सामना पाहायला मिळत आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना गुजरात टायटन्सचा फलंदाज जोस बटलरने झंझावाती फलंदाजी करत ऐतिहासिक कामगिरी केली आहे. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या बटलरने पॉवरप्लेच्या 6 षटकांतच अवघ्या 22 चेंडूत 47 धावा कुटल्या. यामध्ये त्याने 3 चौकार आणि 5 गगनचुंबी षटकारांची आतषबाजी केली. या 5 षटकारांच्या जोरावर बटलरने टी-20 क्रिकेटमध्ये आपल्या 600 षटकारांचा टप्पा पूर्ण केला आहे.

बटलरने या विक्रमासह एका खास क्लबमध्ये प्रवेश केला असून, टी-20 क्रिकेटच्या इतिहासात 600 षटकार मारणारा तो जगातील पाचवा, तर पहिलाच ‘बिगर-वेस्ट इंडीज’ फलंदाज ठरला आहे. यापूर्वी ख्रिस गेल आणि पोलार्डसारख्या चार खेळाडूंनी हा पराक्रम केला होता, मात्र ते सर्व वेस्ट इंडीजचे होते. याआधी मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्सकडून खेळलेल्या बटलरने आता गुजरात टायटन्ससाठी खेळताना ही ऐतिहासिक कामगिरी केली आहे. त्याच्या या तुफानी खेळीमुळे गुजरातने सामन्यावर आपली पकड मजबूत केली आहे. जोस बटलरने 27 चेंडूंमध्ये 52 धावांची खेळी केली आणि त्याला कुलदीप यादवने बाद केले. सध्या सामना सुरू असून 11 षटकांचा खेळ झाला तेव्हा गुजरातने 2 गड्यांच्या मोबदल्यात 126 धावा केल्या होत्या. तर शुभमन गिल (30*) आणि वॉशिंग्टन सुंदर (29*) फलंदाजी करत आहेत.

Comments are closed.