IPL 2026 चा नवा ‘स्पिड किंग’, 23 वर्षांच्या गोलंदाजाने नोंदवला हंगामातील सर्वात वेगवान चेंडू

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

IPL मध्ये फलंदाजांच्या चौकार आणि षटकारांच्या तुलनेत गोलंदाजांच्या वेगवान माऱ्याची चर्चा फारशी होत नाही. मात्र, 23 वर्षांच्या एका हिंदुस्थानी गोलंदाजाने आपल्या वेगवान माऱ्याची दखल घ्यायाला क्रीडा विश्वाला भाग पाडलं आहे. गुजरात टायटन्सचा वेगवान गोलंदाज अशोक शर्माने आपल्या तुफानी वेगाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या 9व्या सामन्यात त्याने चक्क 154.2 किमी/तास वेगाने चेंडू फेकून या हंगामातील सर्वात वेगवान चेंडूचा विक्रम आपल्या नावावर केला. 16व्या षटकात त्याने डोनोवन फरेराला 150.7 किमी वेगाने चेंडू टाकला आणि त्यानंतर षटकाच्या शेवटच्या चेंडूवर ध्रुव जुरेलला 154.2 किमी वेगाच्या खतरनाक यॉर्करने चकित केले. विशेष म्हणजे, डोनोवनचा शॉट अडवताना बोटाला दुखापत झालेली असतानाही त्याने पुढचाच चेंडू 154.2 किमी वेगाने टाकत ही कामगिरी करून दाखवली.

कुटुंबासाठी घेतला कठोर निर्णय, ‘कमबॅक’ला क्लासनचा नकारच

अशोकच्या या कामगिरीने दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज गोलंदाज डेल स्टेन देखील प्रभावित झाला आहे. अशोकचा धावण्याचा वेग, चेंडू फेकताना स्थिर असणारे डोके आणि अचूक लँडिंग या गुणांचे स्टेन यांनी भरभरून कौतुक केले. स्टेनच्या मते, अशोकची गोलंदाजीची शैली अत्यंत ‘क्लीन’ असून वेगवान गोलंदाजांमध्ये असे कसब क्वचितच पाहायला मिळते. या सामन्यात अशोकने आपल्या 4 ओव्हरच्या स्पेलमध्ये तीन वेळा 150 किमी/तास पेक्षा जास्त वेग गाठून सातत्य सिद्ध केले.

या विक्रमी चेंडूसह अशोक शर्माने आयपीएल इतिहासातील सर्वात वेगवान हिंदुस्थानी गोलंदाजांच्या यादीत तिसरे स्थान पटकावले आहे. या यादीत उमरान मलिक (157 किमी) पहिल्या, तर मयंक यादव (156.7 किमी) दुसऱ्या स्थानावर आहे. चालू हंगामात अशोकने एनरिक नॉर्खिया (150.9 किमी) आणि कार्तिक त्यागी (149.7 किमी) यांसारख्या गोलंदाजांना मागे टाकून अव्वल स्थान गाठले आहे.

Comments are closed.