आयपीएलमधील सर्वात वेगवान चेंडू! 154.2 वेगासह अशोक शर्मा पहिल्या पाचमध्येही नाही, लिस्टमध्ये दोन भारतीय
गुजरात टायटन्सच्या अशोक शर्माने शनिवारी (४ एप्रिल) त्याच्या वेगवान गोलंदाजीचे कौशल्य सादर केले. राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या या सामन्यातने त्याने ध्रूव जुरेलला १५४.२ किमी प्रतितास वेगाने चेंडू टाकला. हा आयपीएल २०२६ च्या हंगामातील सर्वात वेगवान चेंडू ठरला आहे, मात्र तरीही त्याला आयपीएलच्या इतिहासात सर्वात ५ वेगवान चेंडूंमध्ये स्थान मिळवता आले नाही. या यादीत तीन विदेशी आणि दोन भारतीय खेळाडूंचा समावेश आहे. तसेच अव्वल स्थानी असलेल्या खेळाडूचा विक्रम मागील १५ वर्षांपासून अबाधित आहे.
आयपीएलच्या इतिहासात सर्वात वेगवान चेंडू ऑस्ट्रेलियाच्या शॉन टेटने टाकला आहे. त्याने २०११ मध्ये दिल्ली डेअरडेव्हिल्सविरुद्ध (आताचा दिल्ली कॅपिटल्स) हा पराक्रम केला आहे. त्याने १५७.७१ किमी प्रतितास वेगाने चेंडू टाकला होता. २०२२ च्या हंगामात लोकी फर्ग्युसन त्याच्याजवळ पोहोचला होता, मात्र त्याला विक्रम मोडता आला नाही. त्याने राजस्थान रॉयल्सविरुद्ध १५७.३० किमी प्रतितास वेगाने चेंडू टाकला होता. यावरून तो शॉन टेटचा विक्रम मोडण्यापासून केवळ ०.४१ किमी प्रतितास फरकाने चुकला.
आयपीएलच्या इतिहासात सर्वात वेगवान चेंडू टाकणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत भारताच्या दोन खेळाडूंचा समावेश आहे. उमरान मलिकने २०२२ मध्ये १५७ किमी प्रतितास वेगाची नोंद केली. टेटचा विक्रम थोडक्यात वाचला मात्र तो आयपीएलमध्ये सर्वात वेगवान चेंडू टाकणारा भारतीय गोलंदाज ठरला आहे. मंयक यादवने २०२४ च्या हंगामात लखनऊ सुपर जायंट्सकडून खेळताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध १५६.७० किमी प्रतितास वेगाने चेंडू ठकला होता.
या यादीत पाचव्या स्थानी दक्षिण आफ्रिकेचा एनरिच नॉर्किया आहे. त्याने २०२० मध्ये दिल्ली कॅपिटल्सकडून खेळताना राजस्थान रॉयल्सविरुद्ध १५६.२२ किमी प्रतितास वेगाने गोलंदाजी केली होती.
आयपीएच्या इतिहासातील सर्वात वेगवान चेंडू-
शॉन टेट (राजस्थान रॉयल्स) – १५७.७१ वि. दिल्ली डेअरडेव्हिल्स, २०११
लॉकी फर्ग्युसन (गुजरात टायटन्स) – १५७.३० वि. राजस्थान रॉयल्स, २०२२
उमरान मलिक (सनरायझर्स हैदराबाद) – १५७ वि. दिल्ली कॅपिटल्स, २०२२
मयंक यादव (लखनऊ सुपर जायंट्स) – १५६.७० वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, २०२४
एनरिक नॉर्सिया (दिल्ली कॅपिटल्स) – १५६.२२ वि. राजस्थान रॉयल्स, २०२०
Comments are closed.