GTvsRR: गुजरातच्या गोलंदाजांना वैभव सूर्यवंशीचे आव्हान, जाणून घ्या खेळपट्टी अहवाल आणि हेड-टू-हेड रेकॉर्ड
आयपीएल २०२६ मध्ये नववा सामना शनिवारी (४ एप्रिल) गुजरात टायटन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स असा खेळला जाणार आहे. हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जाणार असून सामन्याची सुरूवात सायंकाळी ७ वाजून ३० मिनिटांनी होणार आहे. गुजरातने या हंगामातील त्यांचा पहिला सामना गमावला असून राजस्थानने चेन्नई सुपर किंग्जला पराभवाचा धक्का दिला आहे. यामुळे गुजरातचा पहिला तर राजस्थानचा दुसरा विजय मिळवण्याचा प्रयत्न असणार आहे.
पंजाब किंग्जविरुद्ध मोठी धावसंख्या उभारूनही गुजरातला पराभवाचा सामना करावा लागला. या पराभवानंतर ते आता राजस्थानचा सामना करणार आहेत, ज्यांनी पहिल्याच सामन्यात चेन्नईचा पराभव केला आहे. त्यामध्ये वैभव सूर्यवंशीने १७ चेंडूत ५२ धावा केल्या होत्या. स्फोटक फलंदाजी आणि गोलंदाजीमध्ये वेगळपणा असलेले हे दोन संघ आता आमने-सामने येत आहेत.
गुजरात आणि राजस्थान हे दोघे आयपीएलमध्ये आतापर्यंत ८ वेळा समोरा-समोर आले आहेत. त्यामध्ये गुजरातने ६ सामने जिंकले असून राजस्थानने केवळ दोन सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. अहमदाबादमध्ये दोन्ही संघाचे समीकरण २-१ असे आहे. यामधील गुजरातच्या एका विजयामध्ये २०२२ च्या अंतिम सामन्याचा समावेश आहे. त्यामध्ये गुजरातने राजस्थानचा ७ विकेट्सने पराभव केला होता.
या सामन्यासाठीची खेळपट्टी पाहिली तर सीमारेषा मोठी असल्याने बॅट आणि बॉलमध्ये संतुलन राहते, मात्र ही फलंदाजांसाठी अधिक अनुकूल आहे. सामना संध्याकाळचा असल्याने दवाची अडचण जाणवेल आणि धावसंख्येचा बचाव करणे कठीण होईल. त्यामुळे नाणेफेक जिंकल्यास संघ प्रथम गोलंदाजीच करण्याचा निर्णय घेईल.
Comments are closed.