हार्दिक पंड्याने शब्द पाळला… IPL 2026 आधी वानखेडेवरील ग्राऊंड स्टाफला वाटले 10-10 लाखांचे चेक, कारण काय?
हिंदुस्थानी क्रिकेट संघाचा मॅचविनर अष्टपैलू आणि मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पंड्या सध्या एका खास कारणामुळे चर्चेत आला आहे. मैदानातील आक्रमक फलंदाजी आणि भेदक गोलंदाजीसोबतच हार्दिक त्याच्या लक्झरी लाइफस्टाईलसाठी ओळखला जातो. मात्र, आयपीएल 2026 च्या रणधुमाळीपूर्वी हार्दिकने दिलदारपणाचे दर्शन घडवत आपल्या टीकाकारांचीही बोलती बंद केली आहे.
शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या हार्दिकने वानखेडे स्टेडियमच्या ग्राऊंड स्टाफला लाखो रुपयांचे चेक वाटून आपला शब्द पाळला आहे. हार्दिक जेव्हा टी-20 वर्ल्ड कप 2026च्या तयारीसाठी वानखेडेवर तासनतास सराव करत होता, तेव्हा तिथल्या ग्राऊंड स्टाफने त्याला मोलाची साथ दिली होती. हार्दिकच्या सरावासाठी हे कर्मचारी रात्री उशिरापर्यंत थांबायचे. त्यावेळी हार्दिकने त्यांना वचन दिले होते की, जेव्हा मी परत येईल तेव्हा तुम्हाला नक्कीच काहीतरी खास देईल.
आपला हा शब्द पाळत हार्दिकने वानखेडे स्टेडियमच्या ग्राऊंड स्टाफमधील 11 सदस्यांना प्रत्येकी 10 लाख रुपयांचे चेक सुपूर्द केले आहेत. केवळ आर्थिक मदतच नाही, तर हार्दिकने या सर्व कर्मचाऱ्यांसोबत फोटोही काढले. हे फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. त्याच्या या दिलदारपणाचे सध्या सर्वत्र कौतुक होत आहे.
हार्दिक पांड्याने वानखेडे स्टेडियमवरील सर्व मैदानी खेळाडूंना प्रत्येकी 10 लाख रुपये दिले कारण त्याने त्यांना वचन दिले होते की त्यांनी T20 विश्वचषकादरम्यान रात्री उशिरा सराव करण्यास मदत केली होती. pic.twitter.com/KtGsLfgGcz
— अमर💫 (@KUNGFU_PANDYA_0) 26 मार्च 2026
आयपीएल 2026 मध्ये मुंबई इंडियन्सचा पहिला सामना 29 मार्च रोजी कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, जसप्रीत बुमराह आणि तिलक वर्मा यांसारखे दिग्गज खेळाडू मैदानात उतरणार आहेत. गेल्या हंगामातील निराशाजनक कामगिरी विसरून यावेळी सहावी ट्रॉफी जिंकण्यासाठी मुंबईच्या खेळाडूंनी कंबर कसली आहे.
मुंबईने आतापर्यंत 2013, 2015, 2017, 2019 आणि 2020 मध्ये विजेतेपद पटकावले आहे. मात्र गेल्या पाच हंगामात मुंबईला जेतेपदाने हुलकावणी दिली. मध्यंतरी रोहित शर्माकडून नेतृत्वाची धुरा काढून घेण्यात आली आणि गुजरातला विजेतेपद मिळवून देणाऱ्या हार्दिक पंड्याकडे कर्णधारपद सोपवण्यात आले. मात्र हार्दिकच्या नेतृत्वाखालीही मुंबईला विशेष कामगिरी करता आली नाही. मात्र यंदा टी-20 वर्ल्डकप विजेत्या संघातील चार प्रमुख खेळाडू मुंबईच्या संघात आहेत. सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, तिलक वर्मा आणि जसप्रीत बुमराह यांच्यावर मुंबईला सहाव्यांदा विजयी करण्याची जबाबदारी असणार आहे.
Comments are closed.