शिक्कामोर्तब! जडेजाचे राजस्थानमध्ये भव्य पुनरागमन; संजू सॅमसन आता पिवळ्या जर्सीत!!

आयपीएलच्या पुढील वर्षी होणाऱ्या 19व्या हंगामापूर्वी सर्व संघांमध्ये मोठी हालचाल सुरू झाली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चेला अखेर पूर्णविराम मिळाला आहे. रवींद्र जडेजा चेन्नई सुपर किंग्सला सोडून राजस्थान रॉयल्सकडे जाणार की नाही, तसेच संजू सॅमसन सीएसकेमध्ये दाखल होणार की नाही, याबाबत अनेक तर्क-वितर्क रंगले होते. आता IPL च्या अधिकृत घोषणेनं संपूर्ण चित्र साफ झाले आहे. दोन्ही स्टार खेळाडूंमध्ये प्लेअर ट्रेड डील निश्चित झाली असून, यामुळे आयपीएल इतिहासातील सर्वांत मोठ्या विनिमयांपैकी हा एक ठरला आहे.

रवींद्र जडेजाने आयपीएल कारकिर्दीची सुरुवात राजस्थान रॉयल्सकडून केली होती. त्यानंतर 2012 मध्ये तो चेन्नई सुपर किंग्समध्ये दाखल झाला आणि तब्बल 12 हंगाम या संघासाठी खेळला. सीएसकेच्या चार विजेतेपदांमध्ये जडेजाचा मोठा वाटा राहिला आहे. ऑलराउंडर म्हणून सामन्याचे पारडे कधीही बदलण्याची क्षमता जडेजामध्ये आहे. IPL मध्ये 250 पेक्षा अधिक सामने खेळणाऱ्या अनुभवी खेळाडूला राजस्थानने 14 कोटी रुपयांत आपल्या टीममध्ये घेतले आहे. मागील हंगामात त्याला 18 कोटी मिळत होते. म्हणजेच या ट्रेडमध्ये जडेजाच्या पगारात 4 कोटींची घट झाली आहे. तरीही, जडेजाच्या पुनरागमनामुळे राजस्थान रॉयल्सच्या स्क्वाडमध्ये प्रचंड बळकटी येणार हे निश्चित.

गेल्या अनेक हंगामांपासून राजस्थान रॉयल्सचा अविभाज्य खेळाडू आणि कर्णधार असलेला संजू सॅमसन याने आता संघ बदलला आहे. जडेजाच्या ट्रेडनंतर संजूला चेन्नई सुपर किंग्सने आपल्या ताफ्यात सामील केले आहे. 2013 मध्ये आयपीएल पदार्पण करणारा संजू 2016-17 मध्ये दिल्ली कॅपिटल्सकडे गेला होता, पण त्यानंतर तो पुन्हा राजस्थानच्या संघात परतला आणि टीमचा मुख्य आधार बनला. विकेटकीपर-बॅटर म्हणून संजूची सातत्यपूर्ण कामगिरी आणि नेतृत्व कौशल्य पाहता CSK ने त्याला मिळवण्यासाठी तब्बल 18 कोटी रुपये खर्च केले आहेत.

या मोठ्या ट्रेडनंतर IPL 2026 सीजनची रंगत आणखी वाढणार असून, दोन्ही संघांची टीम कॉम्बिनेशन मोठ्या प्रमाणात बदलणार आहे. राजस्थानला जडेजासारखा अनुभवी ऑलराउंडर मिळाला, तर चेन्नईला संजूच्या रूपाने एक धडाडीचा फलंदाज आणि संभाव्य भविष्यातील लीडर मिळाला आहे.

Comments are closed.