आयपीएल 2026 च्या पहिल्याच सामन्यात सीएसकेचा पराभव, तरीही एका गोलंदाजाने मोडला धोनीचा बलाढ्य रेकॉर्ड
आयपीएल २०२६ च्या पहिल्याच सामन्यात पाच वेळेचा विजेता चेन्नई सुपर किंग्जला पराभवाचा सामना करावा लागला. सोमवारी (३० मार्च) गुवाहाटीमध्ये झालेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने चेन्नईचा ८ विकेट्सने पराभव केला. त्यामध्ये एका क्षणाला असे वाटले की चेन्नईचा संपूर्ण संघ १०० धावसंख्येच्या आत बाद होईल, मात्र एका खेळाडूने संघाची लाज राखली. त्याचबरोबर त्याने एमएस धोनीचा एक मोठा विक्रमही मोडला आहे.
धोनी राजस्थानविरुद्धच्या सामन्यात खेळला नाही. तो दुखापतीमुळे दोन आठवडे संघाबाहेर आहे. या सामन्यात चेन्नईला त्याची उणीव भासली. त्याने चेन्नईसाठी आतापर्यंत ६ सामने खेळले नाही आणि त्यामधील ५ सामने संघाने गमावले आहेत. राजस्थानविरुद्धही चेन्नईची सुरूवात निराशाजनक झाली. संजू सॅमसन आणि कर्णधार ऋतुराज गायकवाड ६-६ धावा करत बाद झाले. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेला आयुष म्हात्रे हा तर शून्यावरच बाद झाला.
चेन्नईने १९.४ षटकात १० विकेट्स गमावत १२७ धावा केल्या. या वाईट प्रदर्शनामध्येही एक विक्रम रचला गेला. आठव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेल्या जेमी ओवरटन याने ३६ चेंडूत २ चौकार आणि २ षटकारांसह ४३ धावा केल्या. चेन्नईसाठी एका सामन्यात आठव्या किंवा त्यापेक्षा खालच्या क्रमांकावर फलंदाजी करताना सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम धोनीच्या नावे होता. त्याने २०२४ मध्ये दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध नाबाद ३७ धावा केल्या होत्या. आता हा विक्रम इंग्लंडचा अष्टपैलू ओवरटनच्या नावावर झाला आहे. तसेच त्याने राजस्थानविरुद्ध शेवटच्या विकेटसाठी अंशुल कंबोजसोबत ३२ धावांची भागीदारीही केली.
ओवरटनबरोबर केवळ सरफराज (१७) आणि कार्तिक शर्मा (१८) यांनीच दुहेरी आकडी धावा केल्या. प्रत्युत्तरात राजस्थानचे सलामीवीर यशस्वी जायसवाल आणि वैभव सूर्यवंशी यांनी आक्रमक सुरूवात केली. जायसवाल ३८ धावा करत नाबाद राहिला. वैभवने १७ चेंडूत ४ चौकार आणि ५ षटकार मारत ५२ धावा केल्या. त्यामुळे आरआरने केवळ १२.१ षटकात लक्ष्याचा विजयी पाठलाग केला. हा सामना त्यांनी ८ विकेट्सने जिंकला.
Comments are closed.