IPL 2026 – आज ईडन गार्डन्सवर मुंबईकर संघर्ष; केकेआरचा विजयशोध की पंजाबची हॅटट्रिक, अय्यरवर रहाणे भारी पडणार

अस्सल मुंबईकर कर्णधारांचा ईडन गार्डन्सवर रंगणारा सामना क्रिकेटप्रेमींसाठी खास ठरणार आहे. अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखालील कोलकाता नाईट रायडर्ससमोर श्रेयस अय्यरच्या दमदार फॉर्मात असलेल्या पंजाब किंग्जचे आव्हान उभे ठाकले आहे. एकीकडे रहाणेचा संघ विजयाच्या शोधात झगडतोय, तर दुसरीकडे अय्यरचा पंजाब विजयी हॅट्ट्रिकच्या उंबरठय़ावर उभा आहे. त्यामुळे आजचा सामना केवळ दोन संघांमधला नसून, मुंबईकर मित्रांमधील एक मैत्रीपूर्ण पण तितकाच चुरशीचा संघर्ष ठरणार आहे.

यजमान केकेआरपुढे आयपीएल टी-20 क्रिकेट स्पर्धेत सोमवारी जबरदस्त फॉर्मात असलेल्या पंजाब किंग्ज संघाचे आव्हान असेल.  तीन वेळा विजेतेपद पटकावलेल्या केकेआरला या हंगामात अद्याप विजयाची चव चाखता आलेली नाही. मुस्तफिजूर रहमान, हर्षित राणा, आकाश दीप आणि मथीशा पथिराना यांसारख्या वेगवान गोलंदाजांची कमतरता केकेआरला प्रकर्षाने जाणवत आहे.

संघाने आतापर्यंत दोन सामने खेळले असून, दोन्हींत पराभव पत्करावा लागला आहे. दुसरीकडे, पंजाब किंग्ज सलग तिसरा विजय मिळवण्याच्या निर्धाराने मैदानात उतरणार आहे.

फिन ऍलन, टिम सिफर्ट आणि रचिन रवींद्र हे न्यूझीलंडचे खेळाडू संघात असूनही त्यांचा योग्य वापर करण्यात कोलकाता अपयशी ठरत आहे. एलनला संधी मिळाली असली तरी, सिफर्ट आणि रवींद्र अद्याप बाकावरच आहेत. अष्टपैलू कॅमेरून ग्रीन संघात असूनही गोलंदाजी करत नसल्याने प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. रोव्हमन पॉवेलला बाहेर ठेवण्याच्या निर्णयावरही टीका होत आहे. फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्ही विभागांत कोलकाता कमकुवत दिसत आहे. अजिंक्य रहाणेला सलामीला बढती देण्याचा निर्णयही फारसा यशस्वी ठरलेला नाही. त्यामुळे मुंबईकर रहाणेसाठी हा सामना केवळ विजयाचा नाही, तर स्वतःची लय सापडण्याचीही मोठी संधी आहे.

दुसरीकडे पंजाब किंग्जचा फॉर्म जबरदस्त आहे. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली हा संघ संतुलित दिसत आहे. कूपर कोनॉलीने तिसऱया क्रमांकावर फलंदाजी करताना दोन सामन्यांत 108 धावा करत छाप पाडली आहे. प्रियांश आर्य आणि प्रभसिमरन सिंग यांनी आक्रमक सुरुवात देत संघाला भक्कम पाया दिला आहे.

गोलंदाजीत अर्शदीप सिंग, मार्को यान्सन आणि विजयकुमार वैशाक यांचे त्रिकूट प्रभावी ठरत आहे, तर अनुभवी युझवेंद्र चहल संघाला मजबुती देत आहे.

Comments are closed.