IPL 2026 – कोलकाता-हैदराबाद विजयाच्या शोधात, पहिल्या पराभवानंतर आज ईडन गार्डन्सवर आमने-सामने

यजमान कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात गुरुवारी आयपीएल टी-20 क्रिकेट स्पर्धेतील सहावा सामना होणार आहे. दोन्ही संघांनी हंगामातील आपले पहिले सामने गमावले असल्याने विजयाचे खाते उघडण्याचा त्यांचा निर्धार असेल.

कोलकात्याला 29 मार्चला मुंबई इंडियन्सने 6 गडी राखून हरविले होते, तर हैदराबादला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून त्याच फरकाने हार पत्करावी लागली होती. आता दुसऱ्या सामन्यात केकेआर आपल्या गोलंदाजीतील उणिवा दूर करण्याचा प्रयत्न करेल, विशेषतः फिरकी विभागात. ईडन गार्डन्स या घरच्या मैदानावर केकेआरचा विक्रम भक्कम आहे. येथे खेळलेल्या 95 सामन्यांपैकी त्यांनी 54 सामने जिंकले आहेत. मात्र या हंगामाची सुरुवात त्यांच्या दृष्टीने डळमळीत झाली आहे. गोलंदाजीतील खोलीचा अभाव ही या संघाची मोठी चिंता ठरत आहे. हर्षित राणा आणि आकाश दीप यांच्या दुखापती, मथीशा पथिरानाची अनुपलब्धता आणि कॅमेरून ग्रीनची मर्यादित भूमिका यामुळे संघ कमकुवत दिसत आहे. याशिवाय सुनील नरेन आणि वरुण चक्रवर्ती या फिरकी जोडगोळीच्या कामगिरीबाबतही चिंता आहे.

दुसरीकडे सनरायझर्स हैदराबाद संघालाही पहिल्या पराभवानंतर अशाच अडचणींचा सामना करावा लागत आहे. फलंदाजीत अभिषेक शर्मा, ईशान किशन आणि ट्रव्हिस हेड यांच्यासारखा मजबूत टॉप ऑर्डर असली तरी गोलंदाजी 200 पेक्षा जास्त धावांचा बचाव करण्यात अपयशी ठरतेय.

हैदराबाद अभिषेक शर्मा, ट्रव्हिस हेड, ईशान किशन (कर्णधार, यष्टिरक्षक), हेन्रीक क्लासन, अनिकेत वर्मा, नितीश कुमार रेड्डी, सलिल अरोरा, हर्ष दुबे, हर्षल पटेल, डेव्हिड पेन, जयदेव उनाडकट. कोलकाता फिन अॅलन, अजिंक्य रहाणे (कर्णधार), कॅमरुन ग्रीन, अंगकृष रघुवंशी (यष्टिरक्षक), रिंकू सिंग, रमनदीप सिंह, अनुकूल रॉय, सुनील नरेन, वरुण चक्रवर्ती, वैभव अरोरा, ब्लेसिंग मुझरबानी.

Comments are closed.