शेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या थरारक सामन्यात लखनऊचा हैद्राबादवर 5 विकेट्सने विजय, कॅप्टन पंतचे नाबाद अर्धशतक

आयपीएल २०२६ मध्ये आजचा (५ एप्रिल) पहिला सामना सनरायझर्स हैद्राबाद विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स असा खेळला गेला. हा सामना लखनऊने ५ विकेट्सने जिंकत आपला या हंगामातील पहिला विजय मिळवला आहे. त्याचबरोबर हैद्राबादला घरच्याच मैदानावर पराभूत केले आहे.

हैद्राबादच्या राजीव गांधी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात लखनऊचा कर्णधार रिषभ पंतने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्याचा हा निर्णय मोहम्मद शमीसह इतर गोलंदाजांनी योग्य ठरवला. शमीने सामन्याच्या पहिल्याच षटकात अभिषेक शर्माचा अडसर दूर केला. नंतर लगेचच आपल्या दुसऱ्या षटकात धोकादायक फलंदाज ट्रेविस हेडला बाद केले. त्यामुळे हैद्राबादती स्थिती ३.३ षटकात ३ विकेट्स ११ धावा अशी झाली होती.

हैद्राबादकडून पदार्पण करणाऱ्या लियाम लिविंगस्टोनने निराशा केली. तो २० चेंडूत १४ धावा करत बाद झाला. त्याला दिग्वेश राठीने बाद केले. त्यानंतर हेनरिच क्लासेन आणि नितीश कुमार रेड्डी यांनी संघाचा धावफलक हलता ठेवला. त्यांनी पाचव्या विकेटसाठी ११६ धावांची भागीदारी केली. त्यामुले हैद्राबादला १५० चा टप्पा गाठता आला. क्लासेन ६२ आणि नितीश ५६ धावा करत बाद झाले. त्यांच्या या अर्धशतकाच्या जोरावर हैद्राबादने २० षटकात ९ विकेट्स गमावत १५६ धावा केल्या.

यामध्ये शमीने ४ षटकात केवळ ९ धावा देत २ विकेट्स घेत अप्रतिम कामगिरी केली. त्याला प्रिंस यादव आणि आवेश खान यांनीही चांगली साथ दिली. प्रिंसने ४ षटकात ३४ धावा देत २ विकेट्स घेतल्या. त्याने एसआरएचचा कर्णधार-विकेटकीपर ईशान किशन (१) आणि शिवांग कुमार (५) यांना बाद केले.

प्रत्युत्तरात लखनऊचे सलामीवीर एडेन मार्करम आणि मिचेल मार्श यांनी संघाला चांगली सुरूवात करून दिली. तेवढ्यात मार्श १४ धावा करत इशान मलिंगाचा शिकार झाला. त्यानंतर मार्करमने पंतसोबत दुसऱ्या विकेटसाठी ४० धावांची भागीदारी केली. यामुळे लखनऊ हैद्राबादला त्यांच्या घरच्या मैदानावर धक्का देतो की काय असे वाटत असताना मार्करम ४५ धावा करत बाद झाला. त्याने २७ चेंडूत ६ चौकार आणि २ षटकार मारले. तसेच पंत ५० चेंडूत ६८ धावा करत नाबाद राहिला. त्याने शेवटच्या षटकात ९ धावांची आवश्यकता असताना तीन चौकार मारले.

आयपीएल २०२६ मध्ये हैद्राबादने ३ सामने खेळले असून एक सामना जिंकला आणि लखनऊने २ पैकी एक सामना जिंकला आहे.

Comments are closed.