IPL 2026 – मुंबईने कोलकाताला हरवलं; कॅमेरून ग्रीनच्या गोलंदाजीवरून रहाणे आणि क्रिकेट ऑस्ट्रेलियामध्ये जुंपली!

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

IPL 2026 मध्ये रविवारी (29 मार्च 2026) झालेल्या अटीतटीच्या सामन्यात हार्दिक पंड्याच्या मुंबई इंडियन्सने कोलकाता नाईट रायडर्सचा (KKR) पराभव करत स्पर्धेची विजयी सरुवात केली. केकेआरने प्रथम फलंदाजी करताना 220 धावांचा डोंगर उभा केला होता, मात्र मुंबईने शेवटच्या षटकात हे लक्ष्य गाठून सामना खिशात घातला. या पराभवानंतर केकेआरचा ऑस्ट्रेलियन अष्टपैलू खेळाडू कॅमरून ग्रीन याने गोलंदाजी का केली नाही, यावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. 25.20 कोटींची विक्रमी बोली लावून खरेदी केलेल्या ग्रीनने गोलंदाजी न केल्याने केकेआरच्या रणनीतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत.

सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत जेव्हा कर्णधार अजिंक्य रहाणेला ग्रीनच्या गोलंदाजीबद्दल विचारण्यात आले, तेव्हा त्याने झटकून टाकणारे उत्तर दिले. रहाणे म्हणाला, “ग्रीन गोलंदाजी का करत नाहीये, हे क्रिकेट ऑस्ट्रेलियालाच माहित असेल, त्यांनाच जाऊन विचारा.” रहाणेच्या या अनपेक्षित विधानामुळे क्रिकेट वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाली आणि संघ व्यवस्थापन व ऑस्ट्रेलियन बोर्ड यांच्यात ताळमेळ नसल्याचे चित्र निर्माण झाले.

रहाणेच्या विधानावर आता क्रिकेट ऑस्ट्रेलियाने स्पष्टीकरण देत केकेआरचा दावा खोडून काढला आहे. बोर्डाने म्हटले आहे की, “कॅमेरून ग्रीनच्या कंबरेला दुखापत झाली असून तो काही काळ गोलंदाजी करू शकणार नाही, याची पूर्ण कल्पना केकेआर व्यवस्थापनाला आधीच देण्यात आली होती.” ग्रीनला पूर्णपणे तंदुरुस्त होऊन गोलंदाजी करण्यासाठी अजून 10 ते 12 दिवस लागतील, असेही बोर्डाने स्पष्ट केले. सप्टेंबर 2024 पासून दुखापतीशी झुंजणाऱ्या ग्रीनने टी-20 विश्वचषकातही केवळ 19 चेंडू टाकले होते, तरीही केकेआरने त्याला मोठी रक्कम देऊन संघात स्थान दिले आहे.

Comments are closed.