IPL 2026: मुंबई इंडियन्सच्या संघात हा कोण आला? पठ्ठ्या एका हाताने पकडतो कॅच, व्हिडिओ व्हायरल

इंडियन प्रीमियर लीग अर्थातच आयपीएल २०२६चा हंगाम येत्या २८ मार्चपासून सुरू होत आहे. त्यामुळे सर्व संघ तयारीला लागले आहेत. अनेक संघांनी त्यांच्या सरावाचे व्हिडिओ, फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. त्यामध्ये मुंबई इंडियन्सचा एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. तो खेळाडू एका हाताने झेल घेत आश्चर्यकारक कामगिरी करताना दिसत आहे.

दानिश मालेवार असे त्या खेळाडूचे नाव आहे. तो देशांतर्गत स्पर्धांमध्ये विदर्भाकडून खेळतो. मुंबईने त्याला पहिल्यांदाच आयपीएलमध्ये संधी दिली आहे. तो केवळ एक उत्तम फलंदाजच नाही तर एक उत्तम फिल्डरही आहे, हे त्या व्हिडिओमध्ये दिसून येते. मुंबईच्या क्षेत्ररक्षण प्रशिक्षकाकडून दानिशला कॅचिंगचा सराव दिला जात आहे. या व्हिडिओमध्ये तो एका हाताने झेल घेताना दिसत आहे. आश्चर्यकारक बाब म्हणजे चेंडू सरळ येत नाही, तर दानिशपर्यंत पोहोचण्यापूर्वी रबरच्या काड्यांवर आदळतो. हा सराव स्लिपमध्ये फिल्डींग करण्यासाठी केला जातो. यामध्ये दानिश प्रत्येक वेळी सहजतेने चेंडू पकडतो. यावरून त्याची नजर किती तीक्ष्ण आहेत हे दिसून येते.

दानिशने देशांतर्गत क्रिकेटमधील आपल्या दमदार कामगिरीच्या जोरावर २०२६ च्या हंगामापूर्वी आपला पहिला आयपीएल करार मिळवला. त्याने केवळ १३ प्रथम श्रेणीचे सामने खेळले असता मुंबईने लिलावात त्याला ३० लाख रुपयांच्या मूळ किमतीला आपल्या संघात सामील करून घेतले.

दानिश उजव्या हाताचा टॉप ऑर्डर फलंदाज आहे. तो केवळ २२ वर्षांचा आहे. त्याचा जन्म नागपूरमध्ये झाला आणि तो विदर्भासाठी स्थानिक क्रिकेट खेळतो. त्याने २०२४-२५ च्या रणजी ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात शतक झळकावून विदर्भाला जिंकण्यास मदत केली. त्यानंतर त्याने दुलीप ट्रॉफीमध्ये ईशान्य विभागाविरुद्ध द्विशतक झळकावले. हे त्याचे पहिलेच द्विशत होते.

दानिशने केवळ प्रथम श्रेणीचे क्रिकेट खेळले आहे. त्याने १५ सामन्यांमध्ये ४९.४२ च्या सरासरीने १२८५ धावा केल्या आहेत. त्यामध्ये तीन शतके आणि १० अर्धशतकांचा समावेश आहे.

Comments are closed.