IPL 2026 – मला जाऊद्या ना! NOC चा वाद, RCB कडून खेळण्यासाठी पठ्ठ्याची थेट न्यायालात धाव

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

IPL 2026 च्या 19 व्या हंगामाला दिमाखात सुरुवात झाली. RCB ने आपल्या पहिल्याच सामन्यात सनरायझर्स हैदराबादला पराभवाची धुळ चारत स्पर्धेची विजयी सुरुवात केली. आता आरसीबीचा पुढील सामना 5 एप्रिल रोजी चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध होणार आहे. या दरम्यान, आरसीबीचा खेळाडू नुवान तुषारा आणि श्रीलंका क्रिकेट बोर्ड यांच्यातील वाद विकोपाला गेल्याची माहिती समोर आली आहे. यंदाच्या हंगामात गतविजेत्या रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघाचा भाग असलेल्या तुषाराला अद्याप श्रीलंका क्रिकेट बोर्डाकडून ‘ना हरकत प्रमाणपत्र’ (NOC) मिळालेले नाही. यामुळे नाराज झालेल्या तुषाराने आता थेट कोलंबो जिल्हा न्यायालयात धाव घेतली असून, या प्रकरणाने क्रीडा विश्वात खळबळ उडवून दिली आहे.

श्रीलंका क्रिकेट बोर्डाच्या नियमांनुसार, परदेशी लीगमध्ये खेळण्यासाठी खेळाडूंना फिटनेस चाचणी उत्तीर्ण करणे अनिवार्य आहे. नुवान तुषारा या चाचणीत अपयशी ठरल्याचे कारण देत बोर्डाने त्याला आयपीएलसाठी एनओसी नाकारली आहे. मात्र, तुषाराने या विरोधात न्यायालयात याचिका दाखल केली असून, बोर्डाला एनओसी जारी करण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी केली आहे. पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, या प्रकरणाची सुनावणी 9 एप्रिल रोजी होणार आहे. तुषाराने असा युक्तिवाद केला आहे की, बोर्डासोबतचा त्याचा करार 31 मार्च रोजीच संपला असून तो आता मुक्त खेळाडू आहे.

IPL 2026 – थाला पुन्हा मैदानात आला! पंजाब किंग्सविरुद्ध चेन्नई विजयाचे खाते उघडणार? चाहत्यांचा उत्साह शिगेला

महत्त्वाची बाब म्हणजे, नुवान तुषाराने बोर्डाला आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्यास इच्छुक असल्याचे आधीच कळवले आहे. बोर्डासोबतचा करार पुढे वाढवण्याची त्याची इच्छा नाही, तरीही फिटनेसच्या नावाखाली त्याची अडवणूक केली जात असल्याचा त्याचा आरोप आहे. तुषाराच्या मते, त्याची फिटनेस पातळी कधीही खालावलेली नाही आणि याच तंदुरुस्तीसह त्याने यापूर्वीही अनेक सामने खेळले आहेत.

Comments are closed.