“या वयात अविश्वसनीय”, विराट कोहलीच्या खेळीचा आर अश्विन झाला फॅन
इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल ) २०२६ च्या हंगामात विराट कोहलीने ज्याप्रकारे सुरूवात केली आहे, ते पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. कसोटी आणि आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यांमधून निवृत्त झाला असला तरी विराटची या छोट्या फॉरमॅटमध्ये खेळण्याची शैली तशीच आक्रमक आहे, हे शनिवारी (२८ मार्च) सनरायझर्स हैद्राबादविरुद्ध पुन्हा एकदा दिसले. त्याने टी२० मध्ये दिर्घ काळानंतर खेळत स्फोटक खेळी केली आणि संघाला विजय मिळवून दिला.
विराटने हैद्राबादविरुद्ध २०२ लक्ष्याचा पाठलाग करताना नाबाद ६९ धावांची खेळी केली. त्याच्या या अप्रतिम खेळीमुळे संघाने सहा विकेट्स आणि २६ चेंडू शिल्लक राखत सामना जिंकला. यामध्ये विराटच्या खेळण्याची आक्रमकता आणि दृष्टीकोन पाहून भारताचा माजी फिरकीपटू आर अश्विन प्रभावित झाला आहे. त्याने म्हटले, “तो जे बोलतो ते करुन दाखवतो.”
अश्विन जियो हॉटस्टारवर बोलताना म्हणाला, “एका युवा क्रिकेटपटूप्रमाणे त्याच्यात आजही तीच जिद्द आहे. या वयात तो मला खूपच अचंबित करणारी कामगिरी करत आहे, आमच्या संभाषणादरम्यान मी त्याला हेच सांगतो.”
एका सामन्यातील आठवण सांगताना अश्विन म्हणाला, “तो ४०-४५ धावांवर फलंदाजी करत होता, आरसीबीचा संघ सहज खेळत होता आणि तो एकेरी धाव घेण्यासाठी धावला. तो थांबला आणि दुसरा फलंदाज अर्ध्या वाटेपर्यंत पोहोचण्याआधीच, तो दुसरी धाव घेण्याच्या विचारात होता. सीमारेषा छोटी असूनही अतिरिक्त धावा घेण्यासाठी कोहलीची धडपड कायम त्याची धावा घेण्याची भूक दर्शवते. यावरून तो अजूनही खेळात किती उत्साह दाखवतो, हे दिसून येते.”
हैद्राबादविरुद्ध जेकब डफीच्या गोलंदाजीचेही अश्विनने कौतुक केले आहे. तसेच त्याने म्हटले की रणनीतीमध्ये आरसीबीचे वर्चस्व दिसले, कारण त्यांनी जे नियोजन केले त्याप्रकारे सामना खेळला. विराटवर मात्र सगळ्यांची नजर असणार आहे, त्याने ज्याप्रकारे प्रदर्शन केले ते सर्व अविश्वसनीय होते.
हैद्राबादविरुद्ध डफी सामनावीर ठरला. त्याचे हे आयपीएल पदार्पण होते आणि त्याने पहिल्याच सामन्यात ४ षटकात २२ धावा देत ३ विकेट्स घेण्याची कामगिरी केली.
Comments are closed.