वैभव सूर्यवंशीने नेटमध्ये रविंद्र जडेजाला चांगलेच धुतले! व्हिडिओ व्हायरल

आयपीएल २०२६ च्या हंगामात भारताचा अनुभवी अष्टपैलू रविंद्र जडेजा राजस्थान रॉयल्सकडून खेळणार आहे. ट्रेड डिलनुसार तो चेन्नई सुपर किंग्जकडून राजस्थानमध्ये आला, तर संजू सॅमसन चेन्नईकडे गेला. आयपीएल सुरु होण्याआधी सर्व संघ तयारीला लागले असून अनेकांनी सराव शिबिरे भरवली आहेत. यामध्ये राजस्थानच्या नेटमधील सरावावेळी जडेजा आणि युवा स्फोटक फलंदाजी वैभव सूर्यवंशी यांच्यात स्पर्धा दिसली.
राजस्थानने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेयर केला आहे. त्यामध्ये जडेजा बॉलिंग करत असून त्याने त्याची बाजू बदलली आहे. त्याचा काहीही परिणाम वैभववर झालेला दिसत नाही, तो त्याच्या नेहमीच्या आक्रमक शैलीने फलंदाजी करत आहे. यामध्ये जडेजाने टाकलेल्या प्रत्येक चेंडूवर वैभवने मोठा शॉट खेळण्याचा प्रयत्न केलेला दिसतो. जडेजाने पुन्हा एकदा बाजू बदलली, मात्र तो चेंडू वाइ़ड गेला. या व्हिडिओमध्ये वैभवने जडेजाच्या प्रत्येक चेंडूला सीमारेषेपार पाठवण्याचा प्रयत्न केला आहे.
मागील हंगामात आयपीएल पदार्पण करणाऱ्या वैभवला राजस्थानने १.१० कोटी रुपयांमध्ये संघात घेतले होते. त्याने पहिल्याच हंगामात जबरदस्त फलंदाजी करत सर्वांना चकित केले. त्याने २०२५च्या हंगामात ७ सामन्यात २०६.५५ च्या स्ट्राईक रेटने आणि ३६ च्या सरासरीने २५२ धावा केल्या. त्यामध्ये त्याने एक शतक आणि एक अर्धशतकही केले होते. त्याची सर्वोच्च धावसंख्या १०१ राहिली.
वैभवने बीसीसीआयच्या नमन पुरस्कार सोहळ्यावेळी क्रिकेट समालोचक हर्षा भोगले यांच्या काही प्रश्नांची उत्तरे दिली होती. त्यामध्ये भोगलेंनी त्याला विचारले, “तुला या हंगामामध्ये कोणता विक्रम मोडायचा आहे? सहा चेंडूत सहा षटकार, जलद शतकाचा की क्रिस गेलच्या नाबाद १७५ धावांचा?” यावर त्याने उत्तर दिले, “सर, मला तो क्रिस गेलचा १७५ धावांचा विक्रम मोडायचा आहे.”
वैभवने वरील उत्तर आणि आता नेटमधील जडेजाविरुद्धची फलंदाजी पाहून तो आयपीएल २०२६ च्या हंगामात पुन्हा एकदा विक्रमी खेळी करण्यास तयार आहे, असे दिसते.
जडेजा २००८ चा पहिला-वहिला आयपीएल हंगाम राजस्थानकडून खेळला आहे. तेव्हा संघाने विजेतेपद जिंकले होते. आता पुन्हा एकदा तो राजस्थानकडून खेळताना दिसत आहे. या हंगामामध्ये राजस्थानचा पहिला सामना ३० मार्चला चेन्नई विरुद्ध आहे. हा सामना गुवाहाटीमध्ये खेळला जाणार आहे.
Comments are closed.