IPL 2026 – RCB ला मोठा धक्का! ‘हा’ हुकमी एक्का सुरुवातीच्या सामन्यांना मुकणार
IPL 2026 चा थरार सुरू होण्यापूर्वीच गतविजेत्या रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (RCB) संघाच्या गोटात चिंतेचे वातावरण पसरले आहे. गेल्या हंगामात आरसीबीला जेतेपद मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावणारा ऑस्ट्रेलियाचा दिग्गज वेगवान गोलंदाज जोश हेजलवुड आगामी मोसमातील सुरुवातीच्या काही सामन्यांना मुकण्याची शक्यता आहे. हेजलवुड सध्या दुखापतीतून सावरत असल्याने बेंगळुरूच्या गोलंदाजीची धार सुरुवातीला काहीशी कमी होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
CODE स्पोर्ट्सच्या अहवालानुसार, हेजलवुडला अद्याप फिजिओंकडून ग्रीन सिग्नल मिळालेला नाही. सध्या तो रिहॅबमध्ये असून 11 एप्रिलपूर्वी तो मैदानात उतरण्याची शक्यता धुसर आहे. केवळ हेजलवुडच नाही, तर पॅट कमिन्स देखील सुरुवातीच्या काही सामन्यांसाठी उपलब्ध नसेल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. जोपर्यंत वैद्यकीय पथक पूर्णपणे तंदुरुस्त असल्याचा निर्वाळा देत नाही, तोपर्यंत हेजलवुड हिंदुस्थानात दाखल होऊ शकणार नाही, ज्यामुळे आरसीबीच्या रणनीतीला मोठा फटका बसू शकतो.
जोश हेजलवुडची आकडेवारी पाहता तो आरसीबीसाठी किती महत्त्वाचा आहे हे स्पष्ट होते. त्याने आतापर्यंत 39 आयपीएल सामन्यांत 20.98 च्या सरासरीने 57 बळी टिपले आहेत. 8.27 च्या इकॉनमी रेटसह 25 धावांत 4 बळी ही त्याची सर्वोत्तम कामगिरी राहिली आहे. गेल्या हंगामात त्याने निर्णायक क्षणी विकेट्स काढून आरसीबीला चॅम्पियन बनवण्यात सिंहाचा वाटा उचलला होता. आता त्याच्या अनुपस्थितीत बेंगळुरूचा संघ कोणाला संधी देणार, याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे.
Comments are closed.