IPL 2026 – RCB च्या अडचणीत वाढ; आणखी एक खेळाडू स्पर्धेतून बाहेर! क्रिकेट बोर्डाची आडकाठी
IPL 2026 सुरू होण्यापूर्वी रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघाच्या अडचणी थांबण्याचे नाव घेत नाहीत. वेगवान गोलंदाज यश दयाल बाहेर पडल्यानंतर आता श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज नुवान तुषारा याच्याही खेळण्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. श्रीलंका क्रिकेट बोर्डाने आपल्या नवीन आणि कडक फिटनेस धोरणांतर्गत तुषाराला NOC देण्यास नकार दिला आहे. या नियमानुसार परदेशी लीगमध्ये खेळण्यापूर्वी खेळाडूंना कठीण शारीरिक चाचण्या उत्तीर्ण करणे अनिवार्य आहे, ज्यात तुषारा अपयशी ठरल्याचे समजते.
न्यूजवायरच्या च्या वृत्तानुसार, तुषाराला कोणतीही दुखापत झालेली नाही, मात्र तो बोर्डाच्या फिटनेस मानकांमध्ये बसू शकला नाही. यामुळे त्याचा RCB सोबतचा 1.6 कोटी रुपयांचा करार धोक्यात आला असून, बोर्डाने आपला निर्णय न बदलल्यास त्याला या हंगामाला मुकावे लागेल. एकीकडे दुष्मंथा चमीरा, दसुन शनाका आणि पथुम निसंका यांसारख्या खेळाडूंनी ही चाचणी यशस्वीरित्या पूर्ण केली असली, तरी तुषारासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. नुकत्याच झालेल्या आशिया चषकात प्रभावी कामगिरी करूनही त्याला यापूर्वी टी-20 विश्वचषकात स्थान मिळाले नव्हते, त्यात आता आयपीएलमधील या अडथळ्यामुळे त्याच्या कारकिर्दीसमोर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
गोलंदाजांच्या या सततच्या एक्झिटमुळे RCB व्यवस्थापनाची चिंता प्रचंड वाढली आहे. यश दयाल आणि आता तुषाराच्या अनुपस्थितीमुळे संघाच्या गोलंदाजीच्या नियोजनावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. सध्या या प्रकरणावर आयपीएल किंवा आरसीबी फ्रँचायझीकडून कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. मात्र, श्रीलंका क्रिकेट बोर्डाच्या या कडक भूमिकेमुळे आरसीबीला आता लिलावातून किंवा बदली खेळाडूच्या स्वरूपात नवीन पर्यायांचा शोध घ्यावा लागणार आहे.
Comments are closed.