VIDEO: चिन्नास्वामी स्टेडियममध्ये 'कोहलीला चेंडू द्या' च्या घोषणा, विराटची रिऍक्शन पाहाच

आयपीएल २०२६ मध्ये रविवारी (५ एप्रिल) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी) विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज (सीएसके) यांच्यात सामना खेळला गेला. एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या आरसीबीने ४३ धावांनी विजय मिळवला. या सामन्यादरम्यान संपूर्ण स्टेडियम ‘कोहलीला चेंडू द्या’ या घोषणांनी दुमदुमले. या सामन्यात आरसीबीने प्रथम फलंदाजी केली असता सीएसकेसमोर २५१ धावसंख्येचे लक्ष्य ठेवले होते. धावसंख्येचा पाठलाग करताना चेन्नईच्या काही फलंदाजांनी निराशा केली. तेव्हा चाहत्यांनी विराटला गोलंदाजी द्या, अशी मागणी केली. आरसीबीच्या चाहत्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

या सामन्यात नाणेफेक गमावल्यानंतर आरसीबीने प्रथम फलंदाजी केली. फिल सॉल्ट आणि विराट कोहली यांनी संथ गतीने आरसीबीच्या डावाला सुरूवात केली. दोघांनी तीन षटकात केवळ १७ धावा केल्या. सॉल्ट फॉर्ममध्ये नसल्याने विराटने धावांची गती वाढवण्याची जबाबदारी घेतली. त्याने दोन चौकार आणि एका षटकारासह १८ चेंडूत २८ धावा केल्या. त्याला अंशुल कंबोजने बाद केले.

विराटने आयपीएलच्या या १९ व्या हंगामात दोन सामने खेळले असून त्यामध्ये ९७ धावा केल्या आहेत. त्याने या पहिल्याच सामन्यात सनरायझर्स हैद्राबादविरुद्ध नाबाद अर्धशतकी खेळी केली होती. त्याचा हा फॉर्म पाहता सर्वानी आश्चर्य व्यक्त केले होते, कारण की त्याने शेवटचा टी२० सामना वर्षभरापूर्वी खेळला होता. तो २०२४ चा टी२० विश्वचषक जिंकल्यानंतर आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमधून निवृत्त झाला. आता तो या प्रकारचे सामने केवळ आयपीएलमध्येच खेळतो. तसेच त्याने निवृत्ती घेतल्यानंतर आरसीबीकडून कारकिर्दीतील पहिली आयपीएल ट्रॉफी उंचावली.

आरसीबीने टिम डेव्हिडच्या २५ चेंडूत नाबाद ७० धावांच्या खेळीमुळे २० षटकात तीन विकेट्स गमावत २५० धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात सीएसकेची फलंदाजी कोसळली आणि त्यांनी १९.४ षटकात सर्व १० विकेट्स गमावत २०७ धावा केल्या.

रजत पाटीदारच्या नेतृत्वाखालील आरसीबीचा हा सीएसकेविरुद्ध सलग चौथा विजय ठरला आहे. त्यांनी २०२४, २०२५ मधील दोन्ही सामने आणि आता २०२६ मध्ये सीएसकेला पराभवाचा धक्का दिला आहे.

Comments are closed.