986 रन, 59 सिक्स, 16 कॅच सुटल्या…; एका दिवसांत IPL चा इतिहास-भूगोल बदलला, 2026 च्या हंगामात र

IPL 2026 मध्ये सर्वाधिक 986 धावांचा एकदिवसीय विक्रम : 25 एप्रिल 2026 शनिवारचा दिवस आयपीएलच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदवला गेला. गेल्या 18 वर्षांत कधीही न घडलेलं दृश्य या दिवशी पाहायला मिळालं. एका दिवसात सर्वाधिक धावा होण्याचा विक्रम अक्षरशः चकनाचूर झाला. त्या दिवशी डबल हेडर सामने झाले, पहिला सामना दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब किंग्स यांच्यात, तर दुसरा सामना राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात रंगला होता.

एका दिवसांत IPLचा इतिहास-भूगोल बदलला

अरुण जेटली स्टेडियमवर झालेल्या सामन्यात दिल्लीने प्रथम फलंदाजी करत 20 षटकांत फक्त 2 गडी गमावून तब्बल 264 धावांचा डोंगर उभारला. या डावात केएल राहुलने अप्रतिम फलंदाजी करत 152 धावांची तुफानी खेळी साकारली. मात्र, यानंतर मैदानावर उतरलेल्या पंजाबने इतिहास घडवला. त्यांनी आयपीएलमधील सर्वात मोठा यशस्वी रन चेस पूर्ण करत केवळ 18.5 षटकांत 4 गडी गमावून 265 धावा केल्या आणि अविश्वसनीय असा विजय आपल्या नावावर केला. हा विजय आयपीएलच्या इतिहासातील एक रोमांचक आणि अविस्मरणीय क्षण ठरला.

संध्याकाळच्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने प्रथम फलंदाजी करत 20 षटकांत 6 गडी गमावून 228 धावा केल्या. या डावात वैभव सूर्यवंशीने अविश्वसनीय फलंदाजी करत केवळ 37 चेंडूत 103 धावांची शतकीय खेळी साकारली. यानंतर लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या सनरायझर्स हैदराबादनेही जबरदस्त कामगिरी करत फक्त 18.3 षटकांत 5 गडी गमावून 229 धावा करत सामना जिंकला.

आयपीएलमधील एका दिवसात सर्वाधिक धावा

या दोन्ही सामन्यांमुळे त्या दिवशी एकूण 986 धावा झाल्या आणि आयपीएलमधील एका दिवसात सर्वाधिक धावा होण्याचा विक्रम मोडीत निघाला. दिल्लीच्या सामन्यात 529 धावा, तर जयपूरच्या सामन्यात 457 धावा झाल्या. याआधी 27 एप्रिल 2024 रोजी 899 धावांचा विक्रम नोंदवला गेला होता.

षटकारा-चौकारांचा पाऊस

इतकंच नाही, तर एका दिवसात सर्वाधिक षटकारांचा विक्रमही तुटला. त्या दिवशी एकूण 59 षटकार लगावले गेले, ज्याने आधीचा 53 षटकारांचा विक्रम मागे टाकला. याशिवाय दोन्ही सामन्यांमध्ये मिळून 96 चौकारही पाहायला मिळाले. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांसाठी हा दिवस अविस्मरणीय ठरला.

16 कॅच सुटल्या अन्…

या 986 धावांमागे क्षेत्ररक्षणातील चुका देखील मोठ्या प्रमाणात कारणीभूत ठरल्या. एकूण 16 झेल सोडले गेले, त्यापैकी 8 झेल दिल्ली-पंजाब सामन्यात, तर उर्वरित 8 झेल राजस्थान-हैदराबाद सामन्यात सुटले. या झेल सोडण्यात 14 खेळाडूंचा सहभाग होता. करुण नायर आणि साकिब हुसेन या दोघांनी प्रत्येकी 2-2 झेल सोडले.

हे ही वाचा –

Lungi Ngidi Update : मानेला दुखापत…; लुंगी एनगिडीला नेमकं काय झालं, पुन्हा खेळणार की नाही? दिल्ली कॅपिटल्सने सांगून टाकलं, हॉस्पिटलमधून आली मोठी अपडेट

आणखी वाचा

Comments are closed.