राजस्थानविरुद्ध गुजरात हरला, मात्र साई सुदर्शनने क्रिस गेलचा रेकॉर्ड मोडला! आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा…

गुजरात टायटन्सचा सलामीवीर साई सुदर्शनने शनिवारी (४ एप्रिल) राजस्थान रॉयल्सने दिलेल्या २१० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ७३ धावांची उल्लेखनीय खेळी केली. हा सामना गुजरातने अवघ्या ६ धावांनी गमावला, हा गुजरातचा या हंगामातील सलग दुसरा पराभव ठरला आहे. संघाने सामना गमावला असला तरी सुदर्शनने त्याच्या या अप्रतिम खेळीने दिग्गज क्रिस गेलचा मोठा विक्रम मोडला आहे.

सुदर्शन आयपीएलच्या इतिहासात ४२ डावांनंतर सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे. या यादीत सचिन तेंडुलकर आणि रिषभ पंत यांचाही समावेश आहे. त्याने ४२ डावांनंतर १८७९ धावा केल्या आहेत. गेलने एवढ्याच डावात १८०४ धावा केल्या होत्या. यामुळे आयपीएलच्या इतिहासात ४२ डावांनंतर १८०० धावांचा टप्पा आता या दोन फलंदाजांनी पार केला आहे.

आयपीएलच्या ४२ डावानंतर सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडुंच्या यादीत तिसऱ्या स्थानावर शॉन मार्श आहे, त्याने १६१३ धावा केल्या आहेत. चौथ्या स्थानावर मायकल हसी आहे. त्याने १५९८ धावा केल्या आहेत. सचिनने १४४६ आणि पंतने १४०१ धावा केल्या आहेत.

आयपीएल २०२६ च्या ऑरेंज कॅपची शर्यत पाहिला तर सूदर्शन पहिल्या दहामध्ये पोहोचला आहे. त्याने २ सामन्यात ८३ धावा केल्या आहेत. सध्या ऑरेंज कॅप दिल्ली कॅपिटल्सच्या समीर रिझवीकडे आहे. त्याने २ सामन्यात अर्धशतकी खेळी करताना एकूण १६० धावा केल्या आहेत. तसेच मुंबई इंडियन्सचा रोहित शर्मा ११३ धावांसह दुसऱ्या स्थानी आहे.

आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा (४२ डावांनंतर)
१८७९ – साई सुदर्शन
1804 – ख्रिस गेल

1613 – शॉन मार्श
१५९८ – मायकल हसी
१४४६ – सचिन तेंडुलकर
१४४२ – ऋतुराज गायकवाड

1401 – ऋषभ पंत

Comments are closed.