IPL 2026 – गोलंदाजांसाठी सचिन तेंडुलकरची BCCI कडे मोठी मागणी; ‘इम्पॅक्ट प्लेयर’ नियम हटवण्याचा सल्ला

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

आयपीएलमध्ये फलंदाजांच्या वाढत्या वर्चस्वामुळे आणि धावांच्या डोंगरामुळे गोलंदाजांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. हाच समतोल पुन्हा साधण्यासाठी ‘क्रिकेटचा देव’ सचिन तेंडुलकर यांनी बीसीसीआयला (BCCI) आयपीएलमधून ‘इम्पॅक्ट प्लेयर’ नियम पूर्णपणे काढून टाकण्याचा सल्ला दिला आहे. मुंबईतील एका कार्यक्रमात बोलताना सचिन यांनी स्पष्ट केले की, टी-20 सारख्या छोट्या फॉरमॅटमध्ये या नियमामुळे संघांना एका अतिरिक्त फलंदाजाचा फायदा मिळतो. खेळपट्ट्या आधीच फलंदाजीसाठी अनुकूल असताना, या नियमामुळे गोलंदाजांवरील दबाव कमालीचा वाढतो आणि खेळाचा मूळ समतोल बिघडतो. सामना अधिक रंजक करण्यासाठी हा नियम तातडीने हटवणे गरजेचे आहे.

ESPNcricinfo शी बोलताना, सचिन तेंडुलकर यांनी खेळात सुधारणा करण्यासाठी केवळ ‘इम्पॅक्ट प्लेयर’ नियम हटवण्यावरच भर दिला नाही, तर आणखी दोन महत्त्वपूर्ण बदल सुचवले आहेत. त्यांनी पारंपरिक 6 षटकांच्या पॉवरप्लेचे विभाजन करण्याची शिफारस केली आहे. ज्यानुसार सुरुवातीला 4 षटकांचा पॉवरप्ले असावा (2 क्षेत्ररक्षक बाहेर) आणि उर्वरित 2 षटके कधी वापरायची याचा निर्णय कर्णधारावर सोपवला जावा (3 क्षेत्ररक्षक बाहेर). याशिवाय, जर संघाचा सर्वोत्तम फलंदाज पूर्ण 20 षटके खेळू शकतो, तर मुख्य गोलंदाजालाही 4 ऐवजी 5 षटके टाकण्याची परवानगी मिळाली पाहिजे, असे सचिन यांनी म्हटले आहे. या बदलांमुळे गोलंदाजांना पुनरागमन करण्याची समान संधी मिळेल आणि सामन्याचा दर्जा सुधारेल.

Comments are closed.