IPL2026: कधी निवडणुका तर कधी युद्ध; जाणून घ्या 5 वेळा आयपीएलचं वेळापत्रक का बदलावं लागल?

आयपीएल 2026 च्या वेळापत्रकाची (Schedule) सध्या मोठी चर्चा आहे. आधी हे वेळापत्रक 8 मार्चला जाहीर होणार होते, पण आता मिळालेल्या माहितीनुसार आज, 9 मार्च रोजी याची घोषणा होऊ शकते. हे वेळापत्रक दोन टप्प्यांत जाहीर होण्याची शक्यता आहे; पहिल्या टप्प्यात 15-20 दिवसांचे शेड्युल समोर येईल आणि उर्वरित वेळापत्रक दुसऱ्या टप्प्यात जाहीर केले जाईल.
या निमित्ताने, आयपीएलच्या इतिहासात आतापर्यंत अशा 5 प्रसंगांवर नजर टाकूया जेव्हा विविध कारणांमुळे वेळापत्रकात बदल करावा लागला होता.
जेव्हा आयपीएल दक्षिण आफ्रिकेत खेळवण्यात आले (2009)
आयपीएल ही भारताची लीग असली तरी 2009 मध्ये संपूर्ण हंगाम 18 एप्रिल ते 24 मे दरम्यान दक्षिण आफ्रिकेत खेळवण्यात आला होता. याचे मुख्य कारण म्हणजे त्यावर्षी भारतात होणाऱ्या ‘लोकसभा निवडणुका’. निवडणुकांमुळे देशभर पोलीस सुरक्षा पुरवणे कठीण असल्याने हा निर्णय घेण्यात आला होता.
अर्धे सामने यूएई (UAE) मध्ये (2014)
2014 मध्ये आयपीएलचा सातवा सीझन होता. यावर्षीही लोकसभा निवडणुकांमुळे 16 ते 30 एप्रिल दरम्यानचे सामने यूएईमध्ये झाले. त्यानंतर 2 मे पासून उर्वरित सर्व सामने भारतात खेळवण्यात आले.
कोरोना महामारीमुळे बदल (2020)
2020 मध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे बीसीसीआयने (BCCI) भारतात सामने घेण्यास परवानगी नाकारली होती. त्यामुळे 13 वा सीझन अबू धाबी, दुबई आणि शारजाह येथे पार पडला.
पुन्हा कोरोनाचा फटका (2021)
2021 चा हंगाम 9 एप्रिलला भारतात सुरू झाला होता, पण मध्येच कोरोना रुग्ण वाढू लागल्याने सामने स्थगित करावे लागले. त्यानंतर याच वर्षी 2 सप्टेंबरपासून उर्वरित सामने यूएईमध्ये खेळवण्यात आले.
भारत-पाक तणावामुळे वेळापत्रकात बदल (2025)
2025 मध्ये आयपीएल सुरू असतानाच 22 एप्रिलला पहलगाम येथे मोठा दहशतवादी हल्ला झाला होता. भारतीय लष्कराच्या ‘ऑपरेशन सिंदूर’मुळे निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता वेळापत्रक बदलावे लागले होते. परिणामी 9 मे ते 16 मे दरम्यान एकही सामना खेळवण्यात आला नव्हता.
Comments are closed.