IPL 2026: आयपीएल वेळापत्रकाची घोषणा कधी आणि कुठे? जाणून घ्या सविस्तर माहिती

टी-20 वर्ल्ड कप 2026 (Icc T20 international world cup 2026) संपल्यानंतर आता सर्व क्रिकेट प्रेमींचे लक्ष आयपीएल 2026 च्या वेळापत्रकाकडे लागले आहे. चाहत्यांमध्ये आगामी हंगामाबाबत प्रचंड उत्सुकता असून प्रत्येकजण बीसीसीआय (BCCI) कधी अधिकृत घोषणा करणार याची वाट पाहत आहे. बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया यांनी यापूर्वीच संकेत दिले होते की, 12 मार्चपर्यंत वेळापत्रक प्रसिद्ध केले जाऊ शकते. मात्र, आता ताज्या रिपोर्टनुसार वेळापत्रकाबाबत मोठी माहिती समोर आली आहे.

रिपोर्टनुसार, आयपीएल 2026 चे वेळापत्रक आज म्हणजेच 11 मार्च, बुधवारी जाहीर केले जाणार आहे. विशेष म्हणजे, सध्या संपूर्ण स्पर्धेचे नव्हे तर केवळ पहिल्या टप्प्याचे वेळापत्रक समोर येईल. देवजीत सैकिया यांनी देखील स्पष्ट केले होते की, सुरुवातीला फक्त पहिल्या 20 दिवसांच्या सामन्यांची घोषणा केली जाईल आणि उर्वरित वेळापत्रक नंतर प्रसिद्ध होईल.

आयपीएलच्या वेळापत्रकाची घोषणा आज संध्याकाळी 7 वाजता होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. चाहत्यांना ही घोषणा टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्क (Star Sports) च्या माध्यमातून थेट पाहता येईल. तसेच, जर तुम्हाला मोबाईलवर किंवा डिजिटल प्लॅटफॉर्मवर हे अपडेट्स पाहायचे असतील, तर जिओ हॉटस्टार (JioHotstar) वर याचे लाईव्ह स्ट्रीमिंग केले जाणार आहे.

स्पर्धेच्या तारखांबाबत बोलायचे झाले तर, सुरुवातीला 26 मार्चपासून स्पर्धा सुरू होईल अशी चर्चा होती. मात्र, आता समोर आलेल्या नवीन माहितीनुसार आयपीएल 2026 ची सुरुवात 28 मार्च पासून होणार असल्याचे समजते. या हंगामाचा अंतिम (फायनल) सामना 31 मे रोजी खेळवला जाण्याची शक्यता आहे, ज्यामुळे चाहत्यांना दोन महिने मनोरंजनाची मेजवानी मिळणार आहे.

आयपीएलच्या परंपरेनुसार, हंगामाचा पहिला सामना नेहमीच गतविजेत्या संघाच्या घरच्या मैदानावर होतो. त्यानुसार, 2026 चा पहिला सलामीचा सामना गतविजेते रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) आणि गेल्या हंगामातील उपविजेता संघ पंजाब किंग्स यांच्यात होण्याची दाट शक्यता आहे. हा सामना आरसीबीच्या घरच्या मैदानावर (एम. चिन्नास्वामी स्टेडियम) रंगण्याची पूर्ण शक्यता आहे.

Comments are closed.