IPL ट्रेड मध्ये मुंबई इंडियन्सची एन्ट्री; अर्जुन तेंडुलकरच्या बदल्यात लखनऊकडे 'या' खेळाडूची मागणी

मुंबई इंडियन्स ही फ्रँचायझी ट्रेड मार्केटमध्ये सर्वाधिक सक्रिय मानली जाते. हार्दिक पांड्या, झहीर खान, ट्रेंट बोल्ट, क्विंटन डी कॉक, दिनेश कार्तिक, प्रज्ञान ओझा यांसारख्या स्टार खेळाडूंना या संघाने ट्रेडद्वारे आपल्या ताफ्यात घेतले आहे. आता पुन्हा एकदा ही टीम ट्रेडमध्ये चर्चेत आली आहे. कारण या वेळी अर्जुन तेंडुलकर आणि शार्दुल ठाकूर यांच्या संभाव्य अदलाबदलीची चर्चा आहे.

क्रिकबझच्या वृत्तानुसार, मुंबई इंडियन्स (MI) आणि लखनऊ सुपर जायंट्स (LSG) यांच्यात शार्दुल ठाकूर आणि अर्जुन तेंडुलकर यांच्या ट्रेडसंदर्भात चर्चा सुरू आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, ही डील थेट खेळाडूंची अदलाबदल नसून एकप्रकारची ऑल-कॅश ट्रान्सफर डील असू शकते. म्हणजेच मुंबई अर्जुनला LSG कडे पाठवेल आणि त्याच्या बदल्यात शार्दुल ठाकूरला आपल्या संघात घेईल.

आयपीएलच्या नियमानुसार कोणत्याही ट्रेडची अधिकृत घोषणा बीसीसीआय (BCCI) करते. त्यामुळे दोन्ही फ्रँचायझी सध्या मौन बाळगून आहेत. मुंबई क्रिकेट वर्तुळातील सूत्रांनी सांगितले आहे की, हा एक्स्चेंज स्वॅप लवकरच फायनल होऊ शकतो. त्याचवेळी, 15 नोव्हेंबर रोजी रिटेन आणि रिलीज खेळाडूंची अधिकृत यादी प्रसिद्ध होणार असल्याने ही डील त्याआधी जाहीर होण्याची शक्यता आहे.

शार्दुल ठाकूर गेल्या वर्षी झालेल्या मेगा ऑक्शनमध्ये अनसोल्ड राहिला होता. मात्र, आयपीएल 2025 सुरू होण्यापूर्वी लखनऊ सुपर जायंट्सने त्याला बेस प्राइस दोन कोटी रुपयांत रिप्लेसमेंट खेळाडू म्हणून घेतले होते. शार्दुलने या हंगामात लखनऊकडून 10 सामने खेळले. त्यात त्याने केवळ 18 धावा केल्या, परंतु 13 विकेट्स घेतल्या. विशेष म्हणजे, त्याने नवीन चेंडूसह उत्कृष्ट गोलंदाजी करत संघाला सुरुवातीला महत्त्वाच्या विकेट्स मिळवून दिल्या.

अर्जुन तेंडुलकर मागील काही हंगामांपासून मुंबई इंडियन्सच्या संघाचा भाग आहे. गेल्या दोन लिलावांमध्ये त्याला बेस प्राइस 20 लाख रुपयांत घेतले गेले. मात्र, त्याला मागील हंगामात एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. आतापर्यंत अर्जुनने एकूण 5 सामने खेळले असून 13 धावा आणि 3 विकेट्स घेतल्या आहेत.

या डीलची सुरुवात कोणी केली हे स्पष्ट नसले, तरी दोन्ही संघ गंभीर चर्चेत असल्याचे समजते. काही वर्षांपूर्वी अर्जुनने मुंबईचा संघ सोडून गोवा संघात प्रवेश केला होता आणि तेव्हापासून तो सातत्याने प्रथम श्रेणी क्रिकेट खेळत आहे. परंतु, मुंबईसारख्या बलाढ्य संघात जागा मिळवणे त्याच्यासाठी मोठे आव्हान ठरले आहे.

जर ही डील फायनल झाली, तर अर्जुन तेंडुलकरसाठी ही एक नवीन सुरुवात ठरू शकते. लखनऊमध्ये त्याला अधिक संधी मिळण्याची शक्यता असेल, तर मुंबई इंडियन्सला एक अनुभवी आणि बहुआयामी ऑलराउंडर शार्दुल ठाकूर पुन्हा मिळणार आहे. त्यामुळे आयपीएल 2026पूर्वी ही अदलाबदल स्पर्धेतील सर्वात चर्चेची डील ठरू शकते.

Comments are closed.