IPL 2026: राजस्थानला पुन्हा चॅम्पियन बनवण्यासाठी 14 वर्षीय वैभव सूर्यवंशी सज्ज; 18 वर्षांची प्रतीक्षा संपवणार?

आयपीएल 2026 सुरू व्हायला आता अवघ्या दोन आठवड्यांचा काळ उरला असून सर्वच संघांच्या खेळाडूंनी जोरदार सराव सुरू केला आहे. 14 वर्षीय वैभव सूर्यवंशी (Vaibhav Suryavanshi) आपल्या क्रिकेट करिअरबाबत अत्यंत गंभीर आहे. आयपीएलवर लक्ष केंद्रित करण्यासाठी त्याने चक्क 10 वीची बोर्डाची परीक्षा सोडण्याचा आणि राजस्थान रॉयल्सच्या (RR) कॅम्पमध्ये सामील होण्याचा धाडसी निर्णय घेतला आहे. आता आयपीएल सुरू होण्यापूर्वी वैभवने राजस्थान रॉयल्सला चॅम्पियन बनवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. विशेष म्हणजे राजस्थानने 18 वर्षांपूर्वी 2008 मध्ये पहिले आयपीएल विजेतेपद मिळवले होते.

BCCI ने 15 मार्च रोजी ‘नमन अवॉर्ड्स 2026’ चे आयोजन केले होते. या कार्यक्रमात 14 वर्षीय वैभव सूर्यवंशी देखील उपस्थित होता. एका मुलाखतीदरम्यान त्याने राजस्थान रॉयल्ससाठी ट्रॉफी जिंकण्याची इच्छा व्यक्त केली. तो म्हणाला, या आयपीएल हंगामात माझ्या संघासाठी ट्रॉफी जिंकणे हेच माझे मुख्य ध्येय आहे. ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. मला चांगली कामगिरी करायची आहे जेणेकरून माझ्या खेळाचा संघाला फायदा होईल. संघाच्या विजयात योगदान देऊन फ्रँचायझीला विजेतेपद मिळवून देणे हेच माझे लक्ष्य आहे.

स्टार स्पोर्ट्सला दिलेल्या या मुलाखतीत वैभवने सांगितले की, त्याला राहुल द्रविड आणि राजस्थानच्या वरिष्ठ खेळाडूंकडून खूप काही शिकायला मिळाले. तो पुढे म्हणाला, आरआरच्या टीमचे माझ्या घरगुती आणि अंडर-19 सामन्यांकडे बारीक लक्ष होते. माझे ट्रायल्स खूप चांगले झाले होते, त्यामुळे मी या टीमचा भाग होईन अशी मला खात्री होती. मी राजस्थान रॉयल्ससोबत खूप आनंदी आहे आणि इथे खेळून माझ्यात खूप सुधारणा झाली आहे. इतर खेळाडूंप्रमाणे माझा पहिला कॅम्प खूप रोमांचक होता. त्यावेळी राहुल द्रविड सर देखील संघासोबत होते आणि मला त्यांच्या मार्गदर्शनाखाली शिकण्याची संधी मिळाली.

वैभव सूर्यवंशीने आयपीएल 2025 मध्ये पदार्पण केले होते. त्याने आपल्या पहिल्या हंगामात 7 सामन्यात 252 धावा केल्या. या दरम्यान त्याचा स्ट्राईक रेट 206.55 इतका जबरदस्त होता. त्याने एक अर्धशतक आणि एक शानदार शतकही झळकावले होते. आता आयपीएल 2026 मध्येही त्याच्याकडून अशाच धमाकेदार कामगिरीची अपेक्षा आहे.

Comments are closed.