IPL 2026 – पंजाबचा नवा ‘सुपरस्टार’; पहिल्या सामन्यात प्रतिस्पर्ध्यांना फोडून काढणारा कूपर कोनोली आहे तरी कोण?

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

IPL 2026 मध्ये एका नव्या ताऱ्याचा उदय झाला आहे. ऑस्ट्रेलियाचा 22 वर्षीय अष्टपैलू खेळाडू कूपर कोनोलीने आपल्या पहिल्याच आयपीएल सामन्यात प्रतिस्पर्धी गोलंदाजांची धुलाई केली. महाराजा यादविंद्र सिंह आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या अटीतटीच्या सामन्यात कोनोलीने मॅच विनिंग खेळी करत पंजाब किंग्सला गुजरात टायटन्सविरुद्ध 3 गडी राखून विजय मिळवून दिला.

गुजरात टायटन्सने दिलेल्या 162 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पंजाबची पहिली विकेट पडल्यावर, कर्णधार अय्यरने कोनोलीला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी पाठवले. या संधीचे सोने करत कोनोलीने अवघ्या 44 चेंडूंत नाबाद 72 धावांची अविस्मरणीय खेळी केली. त्याने या खेळीत 5 चौकार आणि 5 षटकार ठोकले. त्याने अवघ्या 34 चेंडूंमध्येच आपले अर्धशतक पूर्ण केले. सामना शेवटच्या षटकापर्यंत गेला आणि शेवटच्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर चौकार ठोकून त्याने संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केला. या उत्कृष्ट कामगिरीसाठी त्याला ‘प्लेअर ऑफ द मॅच’ पुरस्काराने गौरवण्यात आले. पंजाब किंग्सने लिलावात त्याला 3 कोटी रुपयांना खरेदी केले होते.

जाडेजाचं ‘पिवळ्या ‘जर्सी’वरचं प्रेम अजूनही कायम!

ग्लेन मॅक्सवेलचा वारसदार?

कूपर कोनोलीकडे ऑस्ट्रेलिया आणि पंजाब किंग्स या दोन्ही संघांसाठी ग्लेन मॅक्सवेलचा दीर्घकालीन पर्याय म्हणून पाहिले जात आहे. मॅक्सवेलप्रमाणेच कोनोली आक्रमक फलंदाजी करतो आणि उपयुक्त फिरकी गोलंदाजीही करतो. विशेष म्हणजे, ऑस्ट्रेलियाचा माजी स्टार फलंदाज शॉन मार्श हा कोनोलीचा आदर्श आहे. कोनोलीच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीवर नजर मारल्यास, त्याने ऑस्ट्रेलियाकडून तिन्ही फॉरमॅटमध्ये पदार्पण केल आहे. त्याने आतापर्यंत ऑस्ट्रेलियाकडून एक कसोटी सामना, 8 वनडे आणि 11 टी20 सामने खेळले आहेत. विशेष म्हणजे, दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकाच वनडे सामन्यात त्याने 5 बळी घेण्याची किमया साधली होती. तो 2026 च्या टी-20 विश्वचषक संघातही ऑस्ट्रेलियाचा भाग होता.

Comments are closed.