रसिक सलाम दार कोण? एमआयसह तीन संघांनी सोडले वाऱ्यावर अन् आरसीबीने दिली संधी, आता जम्मू-काश्मीर एक्सप्रेस सुसाट
आयपीएल हे युवा खेळाडूंना त्यांची प्रतिभा दाखवण्याचे व्यासपीठ राहिले आहे. अनेकदा या स्पर्धेत उत्तम कामगिरी करण्यासाठी खेळाडूंना प्रतिक्षा करावी लागते आणि त्यासाठी त्यांना योग्य संघाच्या विश्वासाचीही आवश्यकता असते. आयपीएल २०२६ मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी) संघाकडून खेळणाऱ्या रसिक सलाम दार याचीही कहाणी अशीच काहीशी आहे. प्रतिभेला योग्य पाठिंबा मिळाला की त्याचे परिणाम चांगलेच मिळतात, हे या २६ वर्षीय गोलंदाजाने सिद्ध केले आहे.
जम्मू-काश्मीरसाठी देशांतर्गत क्रिकेट खेळणाऱ्या उजव्या हाताचा वेगवान गोलंदाज रसिक सलामचा आयपीएलमधील प्रवासही काही सोपा नव्हता. त्यालाही अनेक चढ-उतार आले, मात्र त्याने न खचता त्याची कामगिरी सुरूच ठेवली. आरसीबीच्या आधी तो अन्य तीन फ्रॅंचायजीचा भाग राहिला आहे.
आयपीएल २०१९ च्या हंगामात रसिकच्या कारकिर्दीची सुरूवात मुंबई इंडियन्समधून झाली, मात्र तेथे त्याला केवळ एकच सामना खेळण्याची संधी मिळाली आण पुढच्याच हंगामासाठी त्याला संघातून काढले गेले. मुंबईनंतर २०२२ कोलकाता नाईट रायडर्सने त्याला संधी दिली, तेथेही त्याला केवळ दोनच सामने खेळता आले आणि नंतर संघातून वगळले गेले.
२०२४ च्या हंगामात दिल्ली कॅपिटल्सकडून खेळताना रसिकला अधिक सामने खेळण्याची संधी मिळाली. त्याने ८ सामन्यांमध्ये ९ विकेट्स घेतल्या आणि आपल्या प्रतिभेची झलक दाखवली, मात्र मेगा लिलावाआधीच दिल्लीनेही त्याच्यावर विश्वास न दाखवता मुक्त केले.
आयपीएल २०२५ च्या लिलावात आरसीबीने रसिकला संघात घेतले. त्या हंगामात तो केवळ ४ सामने खेळला आणि एक विकेट घेतली. त्याची ही कामगिरी पाहता आरसीबीही त्याला संघातून काढते की काय असे वाटत असताना त्यांनी त्याला २०२६ च्या हंगामासाठी कायम ठेवले. त्याने संघाचा विश्वास कायम राखला आणि उत्तम कामगिरी केली.
आयपीएल २०२६ च्या पहिल्या दोन सामन्यांमध्येच रसिकने ५ विकेट्स घेतले होते. बुधवारी (१५ एप्रिल) मात्र त्याने आणखी कमालीची कामगिरी करत सर्वांचे लक्ष वेधले. त्याने लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध ४ षटकात २४ धावा देत ४ विकेट्स घेतल्या. त्याच्या या स्पेलमधील जवळपास १० चेंडू संथ गतीचे होते, त्यामुळे फलंदाजांसाठी अडचण निर्माण झाली होती.
रसिकने एलएसजीच्या एडेन मार्करम, आयुष बडोनी, मुकुल चौधरी आणि आवेश खान यांच्या विकेट्स घेतल्या. या सामन्यात आरसीबीने १४७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग १५.१ षटकात ५ विकेट्स शिल्लक राखत केला.
Comments are closed.