राजस्थान रॉयल्सविरुद्ध धोनीच्या जागी कोणाला मिळणार प्लेईंग इलेवनमध्ये संधी? वाचा सविस्तर

आयपीएल २०२६ च्या हंगामात आज (३० मार्च) चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध राजस्थान रॉयल्स सामना खेळला जाणार आहे. हा सामना गुवाहाटीच्या बरसापारा क्रिकेट स्टेडियमवर रंगणार आहे. या सामन्यावर सर्वांचे लक्ष असणार आहे. त्यामागचे कारण म्हणजे मागील हंगामातील चेन्नईची निराशाजनक कामगिरी आणि आता एमएस धोनी याची अनुपस्थिती. दुखापतीमुळे धोनी काही सामन्यांसाठी संघातून बाहेर झाला आहे. यामुळे त्याच्या जागी कोण अंतिम अकरामध्ये असणार याची चर्चा सुरू झाली. धोनीबरोबर चेन्नईच्या संघातून डेवाल्ड ब्रेविसही काही सामन्यांसाठी बाहेर झाला आहे. यामुळे त्यांची उणीव कोण भरून काढणार.

चेन्नईने लिलावामध्ये २० वर्षाचा डावखुरा फिरकी अष्टपैलू प्रशांत वीर आणि आंतरराष्ट्रीय पदार्पण न केलेल्या कार्तिक शर्मा यांना संघात घेतले आहे. संघाचे संतुलन योग्य राखण्यासाठी चेन्नई त्यांना संधी देण्याची शक्यता आहे. दोघांचे मिळून २१ अधिकृत टी२० सामन्यांचा अनुभव आहे. त्यांना चेन्नईने प्रत्येकी १४.२० कोटी रुपये खर्च करून करारबद्ध केले आहे. दोघांना आजच्या सामन्यात पदार्पण करण्याची संधी आहे.

कार्तिक विकेटकीपर-फलंदाज असून त्याच्यात षटकार मारण्याची क्षमता आहे. तसेच त्याने गेल्या वर्षी चेन्नईसोबत सराव केला आहे. तो देशांतर्गत क्रिकेटमध्ये राजस्थानचे प्रतिनिधित्व करतो. त्याने १२ टी२० सामन्यांत ३३४ धावा केल्या असून त्यात २ अर्धशतकांचा समावेश आहे.

धोनीची जागा घेण्याबाबत उर्विल पटेलचे नाव आघाडीवर आहे. त्याने २०२५ च्या हंगामात तीन सामने खेळताना ६८ धावा केल्या होत्या. सीएसकेने त्याला रिटेन केले आहे. त्याने ५७ टी२० सामन्यांमध्ये १७९.४७ च्या सरासरीने १४२५ धावा केल्या आहेत. वीरला रवींद्र जडेजाच्या जागी संघात स्थान दिले आहे. त्याने केवळ ९ टी२० सामने खेळले असून त्याच्यात खालच्या फळीत येत षटकार मारण्याची क्षमता आहे. त्याने अशी कामगिरी देशांतर्गत क्रिकेटमध्ये केली आहे.

चेन्नईच्या संघात या हंगामामध्ये अनेक बदल दिसत आहेत. कार्तिक आणि वीर यांच्यासोबत आयुष म्हात्रे, सरफराज खान आणि उर्विल पटेल यांनाही अंतिम अकरामध्ये संधी मिळण्याची शक्यता आहे.

असे असले तरी सर्वांचे लक्ष संजू सॅमसनवर असणार आहे. चेन्नईने त्याला यंदाच्या हंगामासाठी राजस्थानकडून ट्रेड केले आहे. आता पहिलाचा सामना त्याचा आधीच्या फ्रॅंचायजीविरुद्ध खेळणार असल्याने आणि त्याची टी२० विश्वचषकातील कामगिरी यामुळे तो आयपीएलच्या १९ व्या हंगामात कशी सुरूवात करतो हे बघणे रोमाचंक असणार आहे. तसेच तो धोनीच्या अनुपस्थितीत विकेटकिपींग करणार हे निश्चित आहे.

चेन्नई सुपर किंग्ज (संभाव्य)- ऋतुराज गायकवाड (कर्णधार), संजू सॅमसन (विकेटकीपर), आयुष म्हात्रे/उर्विल पटेल/सरफराज खान, मॅट शॉर्ट, शिवम दुबे, कार्तिक शर्मा, प्रशांत वीर, जेमी ओव्हरटन/अकेल होसेन, मॅट हेन्री, खलील अहमद , अंशुल कंबोज/गुर्जपनीत सिंग/रामकृष्ण घोष.

Comments are closed.