यंदा आयपीएलचा ‘महाधमाका’, तब्बल 84 सामन्यांचा विक्रमी हंगाम; उद्यापासून ‘रन’संग्राम; बीसीसीआयने जाहीर केला 50 सामन्यांचा दुसरा टप्पा
क्रिकेट जगतात लोकप्रियतेच्या शिखरावर असेलेली आयपीएल टी-20 क्रिकेट स्पर्धा यंदा अधिकच भव्य स्वरूपात होणार आहे. 28 मार्चपासून सुरू होणारा 19 वा हंगाम हा आयपीएलच्या इतिहासातील आतापर्यंतचा सर्वात मोठा हंगाम ठरणार असून तब्बल 84 सामन्यांचा ‘महाधमाका’ रंगणार आहे. 31 मे रोजी अंतिम लढत होणार असून क्रिकेटप्रेमींसाठी हा दोन महिन्यांचा थरारक उत्सव ठरणार आहे. पहिला टप्पा जाहीर करणाऱया बीसीसीआयने आज 50 सामन्यांचा दुसरा टप्पा जाहीर केला असून उर्वरित 14 सामन्यांचा तिसरा टप्पाही लवकरच जाहीर केला जाणार आहे.
नेहमीच धमाकेदार उद्घाटन करणारी आयपीएल यंदा उद्घाटनाविनाच खेळाडूंना रनसंग्रामासाठी मैदानात उतरवणार आहेत. उद्घाटनीय सामन्यात गतविजेते रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात चिन्नास्वामी स्टेडियमवर ‘हायव्होल्टेज’ सामना रंगेल. देशातील निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बीसीसीआयने सावध पवित्रा घेत सुरुवातीच्या टप्प्यात फक्त 20 सामन्यांचे वेळापत्रक जाहीर केले होते तर आज 50 सामन्यांचे वेळापत्रक जाहीर केले.
८४ सामन्यांचे मॅरेथॉन युद्ध
यंदा चेन्नई सुपर किंग्ज, मुंबई इंडियन्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, कोलकाता नाईट रायडर्स, दिल्ली कॅपिटल्स, राजस्थान
रॉयल्स, पंजाब किंग्ज, लखनौ सुपर जायंट्स, गुजरात टायटन्स व सनरायझर्स हैदराबाद हे 10 संघ मैदानावर काwशल्य पणाला लावताना दिसतील. प्रत्येक संघ 16 सामने खेळणार असल्याने म्हणजेच प्रत्येक सामना ‘करो या मरो’ असेल. त्यामुळे चक्क 84 सामने खेळले जाणार आहेत.
प्ले ऑफची धामधूम
अंतिम टप्प्यात 26 मे रोजी क्वालिफायर-1, 27 मे रोजी एलिमिनेटर, 29 मे रोजी क्वालिफायर-2 आणि 31 मे रोजी अंतिम सामना अशी वेळापत्रकाची संभाव्य रूपरेषा असेल. अंतिम लढत पुन्हा बंगळुरूमध्येच रंगणार, म्हणजे शेवटपर्यंत थरार हमखास दिसणार आहे.
रायपूर, धर्मशाळेत पुन्हा आयपीएल
यंदाचे सामने देशातील 12 शहरांमध्ये खेळवले जाणार आहेत. 10 पैकी 7 संघांनी प्रत्येकी एक होमग्राऊंड निवडला आहे, तर बंगळुरू, पंजाब आणि राजस्थान या संघांकडे प्रत्येकी दोन होमग्राऊंड आहेत. शहीद वीर नारायण सिंग स्टेडियम येथे तब्बल 13 वर्षांनंतर आयपीएल सामना रंगणार आहे. या रायपूरमधील सामन्यासह धर्मशाळेतही आयपीएल सामन्यांचा थरार रंगणार आहे.
यंदाचे कडक नियम
सामन्याच्या दिवशी सरावाला पूर्ण बंदी. थेट मैदानात उतरा आणि लढा.
खेळाडूंना फक्त टीम बसनेच प्रवास. ‘व्हीआयपी’ मोकळीक संपली.
खेळाडूंच्या कुटुंबीयांना केवळ हॉस्पिटॅलिटी झोनमध्येच प्रवेश असेल.
सर्व स्टाफ सदस्यांकडे आयडी कार्ड बंधनकारक.
डगआऊटमध्ये कुटुंबीयांना प्रवेश नाही. फक्त खेळावर पह्कस.
ऑरेंज व पर्पल कॅपधारक खेळाडूंना सामन्यादरम्यान कॅप घालणे बंधनकारक.

Comments are closed.