आयपीएलसाठी ब्लेसिंग मुझारबानीने पाकिस्तानला दिला धोका, पीसीबी करणार कारवाई

झिम्बाब्वेचा वेगवान गोलंदाज ब्लेसिंग मुझाराबानी आयपीएल २०२६ हंगामासाठी कोलकाता नाईट रायडर्सच्या (केकेआर) संघात सामील झाला आहे. मुझाराबानीला बांग्लादेशचा मुस्तफिजुर रहमानच्याजागी संघात घेतले आहे. राजकिय तणावामुळे केकेआरने करारबद्ध रहमानला मुक्त केले होते. आता त्यांनी मुझाराबानीला संघात घेतले आणि नवा वाद निर्माण झाला आहे.

पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (पीसीबी) मुझाराबानीविरुद्ध कायदेशी कारवाई करण्याच्या तयारीत आहे. झाले असे की, केकेआरच्या आधी पाकिस्तान सुपर लीगने (पीएसएल) इस्लामाबाद युनायटेडने शेमार जोसेफच्या जागी मुजाराबानीला संघात घेतले होते. त्याला केकेआरकडून खेळण्याची संधी आल्याने त्याने पीएसएलमध्ये खेळण्यास नकार दिला आणि आयपीएलमध्ये खेळण्यास तयार झाला.

एखाद्या खेळाडूने पीएसएलपेक्षा आयपीएलला सर्वात आधी प्राधान्य देण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. गेल्या वर्षीही दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज कॉर्बिन बॉशनेही आयपीएलला पसंती दर्शवली होती. त्याला आधी पेशावर झालमीने ‘डायमंड पिक’ म्हणून करारबद्ध केले होते, नंतर तो मुंबई इंडियन्समध्ये बदली खेळाडू म्हणून सामील झाला. त्यामुळे त्याच्यावर पीएसएलने एक वर्षाची बंदी घातली होती.

काही रिपोर्ट्सनुसार, पीसीबी आता मुजारबानीवर कायदेशीर कारवाई करणार अशी माहिती समोर येत आहे. त्याने नुकत्याच झालेल्या आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक २०२६मध्ये जबरदस्त कामगिरी केली होती. तो सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या खेळाडूंच्या यादीत चौथ्या स्थानावर राहिला. त्याने ६ सामन्यात १३ विकेट्स घेतल्या होत्या.

मुजारबानीने या स्पर्धेत ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या साखळी सामन्यात ४ विकेट्स घेण्याची कामगिरी केली होती. तो सामना झिम्बाब्वेने २३ धावांनी जिंकला आणि संघ सुपर-८मध्ये पोहोचला होता. त्यामुळे आता आयपीएलमध्येही केकेआरसाठी त्याच्याकडून अशाच कामगिरीची अपेक्षा आहे.

Comments are closed.