IPL 2027 – मुंबईची धुरा पुन्हा हिटमॅनच्या खांद्यावर; पण आतापर्यंतच्या 10 कर्णधारांची कामगिरी कशी होती?
IPL 2027 साठी मुंबई इंडियन्सने नुकतीच रोहित शर्माची कर्णधार म्हणून घोषणा केली आहे. मुंबई इंडियन्सच्या सर्वात यशस्वी कर्णधारांमध्ये रोहित शर्माचं नाव पहिल्या क्रमांकावर आहे. रोहित शर्माच्याच नेतृत्वात (2013 ते 2023) मुंबईने सर्वाधिक पाच वेळा आयपीएलचे विजेतेपद पटकावले आहे. तसेच एक चॅम्पियन्स लीग टी-20 ट्रॉफी जिंकली होती. मात्र, त्यानंतर हार्दिक पंड्याला कर्णधार करण्यात आलं आणि मुंबईला म्हणावी तशी कामगिरी करता आली नाही. त्यामुळे आगामी हंगामात रोहितच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्स कशाप्रकारे पुनरागमन करणार, याकडे चाहत्यांच लक्ष असणार आहे.
दरम्यान, मुंबई इंडियन्सच्या आतापर्यंतच्या कर्णधारांचा विचार करता. मुंबई इंडियन्सचे एकूण 10 खेळाडूंनी नेतृत्व केले आहे. साहजिकच रोहित शर्मा या 10 नावांमध्ये आघाडीवर असून त्याने 163 सामन्यांमध्ये संघाला 91 वेळा विजय मिळवून दिला असून 68 सामन्यांमध्ये त्याला पराभवाचा सामना करावा लागला. रोहितच्या नेतृत्वात मुंबईच्या विजयाची टक्केवारी 57.05 टक्के इतकी राहिली आहे. रोहितच्या खालोखाल मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांचा नंबर लागतो. सचिन तेंडुलकर यांच्या नेतृत्वात मुंबईने 2008 ते 2011 दरम्यान 55 सामन्यांपैकी 32 सामन्यात विजय मिळवला.
मुंबईच्या सुरुवातीच्या काळात हरभजन सिंगने 30 सामन्यांत 14 विजय आणि 14 पराभवांसह समतोल नेतृत्व केले होते, तर पोलार्डने 9 सामन्यांत 5 सामन्यांमध्ये संघाला विजय मिळवून दिला. 2013 मध्ये रिकी पाँटिंगने 6 सामन्यांत 3 विजय मिळवल्यानंतर कर्णधारपद सोडले आणि तिथूनच रोहित शर्माच्या सुवर्णयुगाची सुरुवात झाली. याशिवाय हंगामी कर्णधार म्हणून सूर्यकुमार यादवने 2023 ते 2026 दरम्यान 5 सामन्यांत 2 विजय मिळवले, तर 2008 मध्ये शॉन पोलॉकने 4 सामन्यांत 3 सामन्यांमध्ये संघाला विजय मिळवून दिला. तर 2024 ते 2026 या तीन हंगामांत नेतृत्व करणाऱ्या हार्दिक पंड्याला 39 सामन्यांत केवळ 15 विजय मिळवता आले असून त्याची विजयाची टक्केवारी 38.46 इतकी राहिली आहे.
या दिग्गजांव्यतिरिक्त ड्वेन ब्राव्हो आणि जसप्रीत बुमराह यांनीही प्रत्येकी एका सामन्यात मुंबई इंडियन्सचे नेतृत्व केले आहे. ब्राव्होला 2010 मध्ये आपल्या एकमेव सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला होता, तर 2026 च्या हंगामात नियमित कर्णधार हार्दिक पंड्याच्या अनुपस्थितीत जसप्रीत बुमराह मुंबईचा 10 वा कर्णधार ठरला आणि त्याने त्या सामन्यात संघाला विजय मिळवून दिला. आता 2027 मध्ये रोहित शर्माच्या पुनरागमनामुळे मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात नवा उत्साह संचारला आहे.
Comments are closed.