अमेरिका इराणवर हल्ला करणार की माघार घेणार? युद्धाबाबत ट्रम्प प्रशासनात मतभेद असल्याची चर्चा

अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने ट्रम्प यांनी लादलेले टॅरिफ बेकायदा असून ते रद्द करण्याचे आदेश देत ट्रम्प यांना मोठा धक्का दिला आहे. त्यानंतर ट्रम्प यांनी आधी सर्व देशांवर 10 टक्के आणि नंतर 15 टक्के टॅरिफ लावल्याची घोषणा केली. हा वाद सुरू असतानाच आता अमेरिका आणि इराण संघर्षाबाबतही चर्चा सुरू आहेत. ट्रम्प यांनी एनेकदा इराणला धमकी दिली आहे. तसेच दुसरीकडे त्यांनी वाटाघाटीही सुरू ठेवल्या आहेत. तसेच इराणजवळच्या समुद्रात मोठ्या प्रमाणात युद्धनौका पाठवण्यासह युद्धसज्जता वाढवली आहे. त्यामुळे आता अमेरिका इराणवर हल्ला करणार की माघार घेणार, अशा चर्चा सुरू आहेत.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणविरुद्ध कठोर भूमिका घेतली आहे. तसेच आखाती देशात लष्करी तयारी सुरू केली आहे. अरबी समुद्रात लष्करी तैनातीने तणाव वाढवला आहे. अमेरिकेत पुढील काही महिन्यांत मध्यावधी निवडणुका असताननाच हा तणाव वाढल्याने त्याला महत्त्व आले आहे. त्यामळे अमेरिकेच्या प्रशासनातील अनेक अधिकाऱ्यांचे असे मत आहे की, निवडणुकीपूर्वी इराणपेक्षा अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर लक्ष केंद्रित करणे अधिक महत्त्वाचे आहे. त्यामुळे इराणबाबत अमेरिकेच्या प्रशासनात एकमत नसल्याचे दिसून येत आहे.

व्हाईट हाऊसच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, ट्रम्प यांची इराणबाबत आक्रमक भूमिका असूनही, इराणवरील हल्ल्यासाठी प्रशासनात एकमत नाही. मतदारांना महागाई आणि दैनंदिन खर्चाची चिंता असताना सरकार त्यावर उपाययोजना करण्याऐवजी इराणकडे लक्ष केंद्रीत करत आहे, त्यामुळे जनतेत चुकीचा संदेश जात असल्याचे अनेक अधिकाऱ्यांचे मत आहे.

अमेरिकेच्या मध्यावधी निवडणुकीपूर्वी, इराणविरुद्ध संभाव्य लष्करी कारवाईबाबत राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भूमिकेबाबत व्हाईट हाऊसमध्ये मतभेद निर्माण झाले आहेत. मतदारांना महागाई आणि राहणीमानाच्या खर्चाची जास्त चिंता असल्याचे सहाय्यकांचे म्हणणे आहे. या आठवड्यात कॅबिनेट सचिवांसोबतच्या खाजगी ब्रीफिंगमध्ये, रिपब्लिकन मोहिमेच्या अधिकाऱ्यांनी स्पष्टपणे सांगितले की अर्थव्यवस्था हा निवडणूक अजेंड्यावरील प्राथमिक मुद्दा असावा. दीर्घकालीन संघर्ष ट्रम्प आणि पक्ष दोघांसाठीही राजकीय धोका निर्माण करू शकतो. ट्रम्प यांचे राजकारण परराष्ट्र संघर्ष कमी करण्यावर आधारित आहे आणि कायमचे युद्ध संपवणे याला त्यांचे प्राधान्य आहे.

व्हाईट हाऊसच्या दुसऱ्या अधिकाऱ्याने ट्रम्प यांच्या भूमिकेला पाठिंबा देत म्हटले आहे की, राष्ट्रपतींच्या परराष्ट्र धोरणामुळे अमेरिकन लोकांचा विजय झाला आहे. अमेरिका फर्स्ट प्रत्येक हालचालीच्या केंद्रस्थानी आहे, मग ते जगाला सुरक्षित बनवणे असो किंवा आर्थिक फायदे मिळवणे असो. ट्रम्प यांनी शुक्रवारी पुन्हा एकदा आपल्या इशाऱ्याचा पुनरुच्चार केला की तेहरानने निष्पक्ष करार करावा अन्यथा परिणामांना सामोरे जावे. मोठ्या संख्येने विमानवाहू जहाजे आणि लढाऊ विमाने तैनात केल्यानंतर जर कारवाई केली गेली नाही, तर अमेरिकेला आंतरराष्ट्रीय स्तरावर अमेरिकेचे हसे होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

नोव्हेंबरच्या निवडणुकीत रिपब्लिकन पक्ष काँग्रेसच्या दोन्ही सभागृहांवर नियंत्रण मिळवतो की नाही हे ठरणार आहे. विरोधी डेमोक्रॅट्सकडून एक किंवा दोन्ही सभागृहांचा पराभव ट्रम्पच्या उर्वरित कार्यकाळासाठी आव्हाने वाढवू शकतो. सध्या, व्हाईट हाऊसमध्ये युद्धाचा धोका पत्करायचा की केवळ देशांतर्गत अर्थव्यवस्थेवर लक्ष केंद्रित करायचे यावर प्रशासनात चर्चा सुरू आहे.

Comments are closed.