इराणची आक्रमक कारवाई; शत्रूची पाणबुडी केली उद्ध्वस्त, होर्मुझच्या सामुद्रधुनीत दोन ऑईल टँकर्सही भस्मसात

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

इराणच्या नौदलाने होर्मुझच्या सामुद्रधुनीजवळ शत्रूची पाणबुडी उद्ध्वस्त केल्याचा आणि दोन व्यावसायिक तेलवाहू जहाजांचे नुकसान केल्याचा दावा केला आहे. इराणच्या सरकारी प्रसारमाध्यमांनी नौदलाच्या जनसंपर्क विभागाच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे. शुक्रवारी सकाळी होर्मुझ सामुद्रधुनीच्या पूर्वेकडील भागात ही कारवाई करण्यात आली. या सागरी क्षेत्रात विनापरवाना प्रवेश करणाऱ्या आणि लष्कराच्या इशाऱ्यांकडे दुर्लक्ष करणाऱ्या जहाजांना इराणने कडक शब्दांत इशारा दिला आहे.

इराणी नौदलाने दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सकाळी त्यांच्या हद्दीत संशयास्पदरीत्या वावरणाऱ्या एका शत्रूच्या पाणबुडीला इराणी नौसैनिकांनी लक्ष्य करून उद्ध्वस्त केले. याच भागात दोन व्यावसायिक तेलवाहू जहाजांना जलसुरुंगांची धडक बसल्याने त्यांना आग लागली. ही जहाजे आपली ट्रॅकिंग सिस्टीम बंद ठेवून, तसेच सागरी सुरक्षेच्या नियमांचे आणि इशाऱ्यांचे उल्लंघन करून अनधिकृत आणि असुरक्षित मार्गावरून प्रवास करत होती. या घटनेला जहाजांचे मालक आणि व्यावसायिक ऑपरेटरच जबाबदार असून बेकायदेशीर वाहतुकीचे परिणाम त्यांना भोगावे लागतील, असे इराणने म्हटले आहे. तसेच इराणच्या सशस्त्र दलाच्या देखरेखीखालील क्षेत्रात कोणतीही घुसखोरी किंवा चिथावणीखोर कारवाई केल्यास त्याला अत्यंत कठोर प्रत्युत्तर दिले जाईल, असा इशाराही लष्कराने दिला आहे.

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांवर विसंबून राहून बेकायदेशीरपणे आणि समन्वयाशिवाय प्रवास करणाऱ्या जहाजांसाठी होर्मुझची सामुद्रधुनी बंद करण्यात आली असल्याचे इराणने जाहीर केले आहे. जोपर्यंत इराणच्या अटी मान्य केल्या जात नाहीत, तोपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा जलमार्ग बंदच राहील, असे मेजर जनरल यझिदी यांनी म्हटले आहे. इराणच्या या आक्रमक पवित्र्यामुळे या भागातील तणाव आता शिगेला पोहोचला आहे.

Comments are closed.