जॉर्डनमधील अमेरिकन लष्करी तळावर इराणचा १० बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांनी हल्ला, आखाती देशांमध्ये पुन्हा तणाव
इराण आणि अमेरिकेमधील तणाव पुन्हा एकदा शिगेला पोहोचला आहे. इराणने जॉर्डनमधील अल-अझरक या अमेरिकन लष्कराकडून वापरल्या जाणाऱ्या हवाई तळावर १० बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागल्याचा दावा केला आहे. मात्र जॉर्डनच्या हवाई संरक्षण प्रणालीने यातील बहुतांश क्षेपणास्त्रे हवेतच नष्ट केली असून कोणतीही जीवितहानी किंवा मोठे नुकसान झालेले नसल्याचे वृत्त आहे.
रॉयटर्सच्या वृत्तानुसार, इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सने हा हल्ला केला आहे. इराणच्या म्हणण्यानुसार, अमेरिकेने नुकत्याच केलेल्या लष्करी कारवाईला प्रत्युत्तर म्हणून हा हल्ला करण्यात आला आहे. जॉर्डनच्या लष्कराने स्पष्ट केले आहे की, त्यांच्या हवाई संरक्षण यंत्रणेने बहुतांश क्षेपणास्त्रे हवेतच उडवून लावली. काही क्षेपणास्त्रांचे अवशेष जमिनीवर पडले, मात्र यात कोणालाही इजा झालेली नाही.
या हल्ल्यानंतर इराणने अमेरिकेला थेट धमकी दिली आहे. “जर दहशतवादी अमेरिकन सैन्याने पुन्हा अशी आक्रमक कारवाई केली, तर या संपूर्ण क्षेत्रातील अमेरिकेचे इतर लष्करी तळही आमच्या हल्ल्यांपासून सुरक्षित राहणार नाहीत,” असा स्पष्ट इशारा इराणकडून देण्यात आला आहे. दरम्यान, जॉर्डनमधील अल-अझरक हा एक अत्यंत महत्त्वाचा लष्करी तळ आहे. येथून जॉर्डनच्या हवाई दलासोबतच अमेरिकन सैन्यही आपल्या लष्करी मोहिमा राबवते. मध्य पूर्वेतील अमेरिकेच्या रणनीतीसाठी हा एक मोक्याचा तळ मानला जातो आणि याच कारणामुळे इराणने त्याला लक्ष्य केले.
Comments are closed.