Iran Israel US War – हिंदुस्थानची प्रगती रोखण्यासाठी अमेरिकेने युद्ध छेडले! इराणच्या आरोपाने जगभरात खळबळ

जग तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर असल्याची चर्चा होऊ लागली आहे. अमेरिका – इस्रायलकडून इराणवर झालेल्या हल्ल्यात तेथील सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा मृत्यू झाला आणि युद्धाचा भडका उडाला. बिथरलेल्या इराणने मग प्रतिहल्ला करत आपल्या शेजारील देशातील अमेरिकेची सैन्य तळे लक्ष्य केली. तसेच इस्रायलवर देखील क्षेपणास्त्रे डागली. यासगळ्या प्रकारामुळे परिस्थिती आणखी चिघळत असल्याचे दिसत आहे.

मात्र याच दरम्यान इराणच्या राजदूताकडून मोठा दावा करण्यात आला. हिंदुस्थानसह चीन आणि रशिया यांच्या प्रगतीला खिळ बसवण्यासाठी अमेरिकेने युद्ध छेडल्याचा आरोप करत खळबळ उडवून दिली आहे.

इराणने अमेरिका आणि इस्रायलसोबत सुरू असलेला संघर्ष संपवण्यासाठी चर्चेची तयारी दर्शवली आहे, मात्र ही चर्चा सन्मानाने आणि कोणत्याही दबावाशिवाय व्हावी, अशी अट घातली आहे. इराणच्या सर्वोच्च नेत्याचे विशेष प्रतिनिधी अब्दुल मजीद हकीम इलाही यांनी स्पष्ट केले की, इराण शांततेसाठी तयार आहे, परंतु त्यांना झुकवण्याचा प्रयत्न खपवून घेतला जाणार नाही.

‘एएनआय’शी बोलताना इलाही म्हणाले, ‘आम्ही युद्ध थांबवण्यासाठी आणि वाटाघाटीसाठी तयार आहोत. परंतु ही चर्चा सन्मानाने व्हायला हवी, इराणवर काहीतरी लादण्यासाठी नको. आम्ही केवळ स्वतःचा बचाव करत आहोत आणि आम्ही आमच्या हक्कासाठी लढत आहोत’. त्यांनी भर दिला की, शांततेच्या बदल्यात इराणला भविष्यात कोणतेही हल्ले न होण्याचे आश्वासन आणि लादलेले निर्बंध हटवणे आवश्यक आहे.

हल्ले करून चर्चा शक्य नाही

सध्याच्या परिस्थितीवर भाष्य करताना ते म्हणाले, ‘नाही, अशा परिस्थितीत कोणीही चर्चेसाठी तयार होणार नाही. आमच्यावर हल्ले करायचे आणि आम्ही चर्चा करायची? हे शक्य नाही. पण जर त्यांनी युद्ध थांबवले, पुन्हा हल्ला न करण्याचे आश्वासन दिले आणि इराणवरील निर्बंध हटवले, तर आम्ही चर्चेसाठी तयार का नसू? आम्हाला शांतता हवी आहे’. अमेरिकेनेच हे युद्ध सुरू केले असून त्यांनीच ते थांबवावे, असा पुनरुच्चार त्यांनी केला.

ओमानमधून चर्चा सुरू होते

इलाही यांनी खुलासा केला की, ताज्या हल्ल्यांपूर्वी इराण ओमानमार्फत अमेरिकेशी चर्चा करत होता. ‘गेल्या आठवड्यातील घटनांकडे पाहिल्यास, इराण ओमानच्या माध्यमातून अमेरिकेशी बोलणी करत होता आणि दोन्ही पक्ष चर्चेच्या टेबलावर होते. आम्ही एका निर्णयापर्यंत पोहोचत होतो. अगदी शेवटच्या दिवशी ओमानच्या परराष्ट्रमंत्र्यांनी आभार मानले होते की एक मोठी संधी मिळाली आहे. आम्ही खूप प्रगती केली होती, पण त्यानंतर लगेचच अमेरिका आणि इस्रायलने आमच्यावर हल्ला केला’, असे त्यांनी सांगितले.

अमेरिका भारताला रोखण्यासाठी युद्धाला खतपाणी घालत आहे चीन रशियाचा उदय इराणचा मुत्सद्दी

इराणी मुत्सद्दी अब्दुल मजीद हकीम इलाही यांचा दावा आहे की अमेरिका वर्चस्व टिकवण्यासाठी आणि भारत, चीन आणि रशियाचा उदय रोखण्यासाठी संघर्ष निर्माण करत आहे. आपल्याला बातम्यांमध्ये स्वारस्य असल्यास कृपया अधिक वाचा.

ट्रम्प यांचा पवित्रा: ‘खूप उशीर झालाय’

दुसरीकडे, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणचा हा प्रस्ताव ‘खूप उशीर झाला आहे’ असे म्हणत फेटाळून लावला आहे. इराणची लष्करी पायाभूत सुविधा, विशेषतः त्यांचे नौदल, हवाई दल आणि हवाई संरक्षण यंत्रणा मोठ्या प्रमाणात ‘उध्वस्त’ करण्यात आली असल्याचा दावा ट्रम्प यांनी केला आहे. इराणची अणू आणि बॅलिस्टिक क्षेपणास्त्र क्षमता पूर्णपणे नष्ट होईपर्यंत लष्करी कारवाई सुरूच राहील, असे ट्रम्प यांनी स्पष्ट केले.

अमेरिकेचे षडयंत्र?

इराणच्या भूमिकेचे समर्थन करताना इलाही यांनी अमेरिकेवर गंभीर आरोप केला. ते म्हणाले, ‘अमेरिकेचे अंतिम ध्येय केवळ इराण नाही. आमच्या सरकारला लक्ष्य केल्यानंतर ते इतर राष्ट्रांकडे वळतील. नजीकच्या भविष्यात भारत, चीन, रशिया आणि अमेरिका हे जगातील सर्वात शक्तिशाली देश असतील. मात्र अमेरिकेला कोणताही भागीदार नको आहे. त्यांना हिंदुस्थान किंवा चीन शक्तिशाली बनलेले पाहायचे नाही. त्यामुळेच हे वर्चस्व टिकवून ठेवण्यासाठी ते अशा युद्धांना खतपाणी घालत आहेत.’

इराणमध्ये स्थिरता: राष्ट्राध्यक्षांची ग्वाही

दरम्यान, इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांनी देश स्थिर असल्याची ग्वाही दिली आहे. ते म्हणाले, ‘आम्ही राज्यपालांच्या थेट संपर्कात आहोत. परिस्थिती अपवादात्मक असली तरी देशाचे काम थांबलेले नाही. प्रांतांना आवश्यक अधिकार देऊन स्थानिक परिस्थितीनुसार निर्णय घेतले जात आहेत. राष्ट्रीय एकता हीच आमची मुख्य संपत्ती आहे’.

दरम्यान, इराणच्या राजदूताकडून करण्यात आलेला दावा हा खळबळ उडवून देणारा आहे. रशियाने या आधीच इस्रायल आणि अमेरिकेकडून झालेल्या हल्ल्यावर प्रतिक्रिया देताना असे हल्ले योग्य नसल्याचे म्हटले होते. इराणच्या राजदूताने केलेल्या दाव्यानंतर हिंदुस्थान, चीन आणि रशिया काय भूमिका घेणार याकडे साऱ्या जगाचं लक्षं लागलं आहे.

Comments are closed.