इराणने इस्रायलचा शेअरबाजार उडवला, रुग्णालयही उडवले; 176 लोक जखमी

शरणागती पत्करणार नाही, अशी आक्रमक भूमिका जाहीर करीत युद्धाच्या रणांगणात उतरलेल्या इराणने गुरुवारी इस्रायलच्या चार प्रमुख शहरांत 30 क्षेपणास्त्रे डागली. इस्रायलच्या स्टॉक मार्केटची इमारत, रुग्णालयासह अनेक ठिकाणी क्षेपणास्त्रांच्या सहाय्याने हल्ले करण्यात आले. यात 176 हून अधिक लोक जखमी झाले. सहा दिवसांच्या संघर्षात 5,110 लोक बेघर झाल्याने इस्रायलमध्ये ‘हल्ला’कल्लोळ उडाला आहे.

इस्रायलच्या सुरुवातीच्या हल्ल्यांदरम्यान संयम दाखवलेल्या इराणने अमेरिकेच्या लूडबुडीनंतर इस्रायलवर आक्रमकपणे हल्ले सुरू केले आहेत. मंगळवारी रात्री उशिरा युद्धाची अधिकृत घोषणा करून इराणने हल्ल्यांचा दणका दिला आहे. गुरुवारी सकाळी इराणने तेल अवीव, बेअरशेबा, रमत गान आणि होलोन या चार प्रमुख इस्रायली शहरांवर क्षेपणास्त्र हल्ला केला. तेल अवीवमधील इस्रायली स्टॉक एक्स्चेंज इमारत आणि बीअरशेबा येथील सोरोका रुग्णालयाबरोबर विविध ठिकाणी 30 क्षेपणास्त्रे डागण्यात आली. यात इस्रायलचे 176 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. इराण-इस्रायल युद्ध गुरुवारी सातव्या दिवशीही धगधगते राहिल्याने जगाची चिंता वाढतीच आहे. युद्धात 24 इस्रायली लोक ठार झाले असून इराणमध्ये 639 लोकांचा मृत्यू, तर 1329 लोक जखमी झाले आहेत.

खोमेनींना सोडणार नाही; इस्रायलची खुली धमकी

इराणने हल्ल्यांचा धडाका सुरू ठेवल्यानंतर इस्रायलने थेट इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला खोमेनी यांना टार्गेट केले. खोमेनी हे इराणचे हुकूमशाह आहेत. त्यांना जिवंत राहण्याचा अधिकार नाही. आम्ही त्यांना सोडणार नाही, अशी खुली धमकी इस्रायलने दिली आहे. इराणने केलेला हल्ला युद्ध गुन्हा आहे. या हल्ल्याला खोमेनी जबाबदार असल्याचा दावा करीत इस्रायलचे संरक्षणमंत्री इस्त्राएल काट्ज यांनी खोमेनींवर निशाणा साधला. दरम्यान, इराणवर हल्ला करण्याचा विचारही करू नका, इस्रायलला थेट लष्करी मदत कराल तर परिस्थिती आणखी बिघडेल, असे रशियाचे उपपरराष्ट्रमंत्री सर्गेई रियाबकोव्ह यांनी गुरुवारी अमेरिकेला बजावले.

इस्रायलचा इराणच्या अराक अणुभट्टीवर हल्ला

इराणच्या हल्ल्यानंतर भडकलेल्या इस्रायलने इराणच्या अराक अणुभट्टीवर जोरदार हल्ला केला. हल्ल्यात मोठे नुकसान झाल्याचा अंदाज आहे, मात्र त्याची नेमकी माहिती समोर आलेली नाही. हल्ल्याच्या काही तास आधी इस्रायली सैन्याने अराक आणि खोंडूब शहरांतील रहिवाशांना त्यांचा परिसर रिकामा करण्याचा इशारा दिला होता. अराकमध्ये मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रांचे उत्पादन होते. तसेच अराकपासून जवळपास 40 किमी अंतरावर असलेल्या खोंडूबमध्ये आयआर-40 जड पाण्याची अणुभट्टी आहे. ही सुविधादेखील इराणच्या अणुकार्यक्रमाचा महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळे या दोन्ही तळांवरील हल्ला इराणच्या अणु महत्त्वाकांक्षेला थेट धक्का मानला जात आहे.

Comments are closed.