युद्ध हिंदुस्थानच्या उंबरठ्यावर; इराणची क्षेपणास्त्रे थेट हिंद महासागरात; अमेरिका-ब्रिटनच्या लष्करी तळाला केले टार्गेट

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

इराण, इस्रायल आणि अमेरिकेमध्ये गेल्या 22 दिवसांपासून युद्ध सुरू आहे. 28 फेब्रुवारीला युद्धाचा भडका उडाला आणि अवघे जग याच्या कचाट्यात आले. दरम्यानच्या काळात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्लाह अली खामेनी हे हल्ल्यात मारले गेले. त्यानंतर इराणही पेटून उठला आणि आखातातील अमेरिकन तळांवर इराणने क्षेपणास्र, ड्रोन हल्ले केले. आता हे युद्ध हिंदुस्थानच्या उंबरठ्यावर पोहोचले इराणची क्षेपणास्त्रे थेट हिंद महासागरात धडकली आहेत.

इराणने प्रथमच हिंद महासागरात असलेल्या अमेरिका आणि ब्रिटनच्या संयुक्त डिएगो गार्सिया या लष्करी तळाला लक्ष्य केले आहे. यामुळे एकच खळबळ माजली आहे. तेहरानने डागलेली दोन बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे 4 हजार किलोमीटरचा प्रवास करून डिएगो गार्सिया या तळाच्या दिशेने झेपावली होती.

‘वॉल स्ट्रीट जर्नल’ने अमेरिकन अधिकाऱ्यांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, इराणने डिएगो गार्सिया तळावर दोन बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागली. यातील एक क्षेपणास्त्र वाटेतच निकामी झाले, तर दुसरे अमेरिकन युद्धनौकेने नष्ट केले. जरी ही क्षेपणास्त्रे तळावर पडली नसली तरी इराणची मारक क्षमता आता4 हजार किलोमीटरपर्यंत पोहोचल्याचे यातून सिद्ध झाले आहे. यामुळे हिंद महासागरातील अमेरिकेच्या सुरक्षिततेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

US Iran Israel War – होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये रणकंदन होणार; अमेरिकेच्या 3 युद्धनौका आणि 2500 मरीन कमांडो आखाताकडे रवाना

दरम्यान, शनिवारी पहाटे इराणची राजधानी तेहरानमध्ये अनेक भीषण स्फोट झाले. इस्रायली सैन्याने या वृत्ताला दुजोरा दिला आहे. इस्रायलने इराणमधील महत्त्वाच्या लष्करी ठिकाणांना लक्ष्य केले आहे. तेहरानच्या आझादी टॉवर, ऑलिम्पिक व्हिलेज आणि माजंदरान प्रांतातील डोंगराळ भागात लढाऊ विमानांची मोठी हालचाल आणि स्फोटांचे आवाज ऐकू आले.

युद्धाचा शेवट जवळ?

दरम्यान, ऑपरेशन एपिक फ्युरी येत्या 4 ते 6 आठवड्यांत संपू शकते. इराणची लष्करी शक्ती आणि अण्वस्त्र क्षमता नष्ट करण्यात मोठी प्रगती झाल्याचा दावा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे.

Comments are closed.