इराणने दोन जहाजे ओढत नेली, हिंदुस्थानला युद्धाचा फटका
इराण-अमेरिकेमधील युद्धविरामाची मुदत संपण्याच्या शेवटच्या दिवशी बुधवारी होर्मुझच्या सामुद्रधुनीत पुन्हा तणाव वाढला. या तणावाचा फटका हिंदुस्थानला बसला. इराणच्या रिव्होल्युशनरी गार्डने हिंदुस्थानकडे येणाऱ्या जहाजासह तीन जहाजांवर गोळीबार केला. यातील दोन जहाजे जप्त करून इराणच्या दिशेने ओढून नेण्यात आली असून त्यात हिंदुस्थानकडे येणाऱ्या जहाजाचाही समावेश आहे.
इराणच्या होर्मुझ बंदीला उत्तर म्हणून अमेरिकी नौदलाने इराणच्या बंदरांची नाकेबंदी केली आहे. ही नाकेबंदी उठत नाही तोपर्यंत दुसऱ्या फेरीची चर्चा होणार नाही अशी भूमिका इराणने घेतली आहे. त्यामुळे युद्धविरामाची मुदत संपली तरी चर्चा सुरू होऊ शकलेली नाही. अशातच इराणच्या रिव्होल्युशनरी गार्डने आज अधिक आक्रमक पवित्रा घेत होर्मुझमध्ये दिसणाऱ्या जहाजांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली. ‘यूके मेरिटाइम ट्रेड ऑपरेशन सेंटर’ने दिलेल्या माहितीनुसार, इराणच्या बोटींनी आज तीन जहाजांवर गोळीबार केला. ओमानच्या समुद्रात 15 नॉटिकल मैलावर असताना लायबेरियाच्या ‘एपामिनोंदास’ या जहाजावर हल्ला झाला. हे जहाज गुजरातच्या कच्छ जिह्यातील मुंद्रा बंदराच्या दिशेने येत होते. दुसरा हल्ला इराणच्या किनाऱ्यापासून आठ नॉटिकल मैलावर असलेल्या पनामाच्या युपहरिया जहाजावर झाला, तर तिसरा हल्ला ओमानच्या खाडीत ‘एमएससी फ्रान्सेस्का’ या जहाजावर झाला.
युद्धविराम वाढवण्याची घोषणा
युद्धविरामाची मुदत संपण्याच्या आदल्या दिवशीपर्यंत इराणला धमक्या देणारे अमिरेकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आज पुन्हा माघार घेतली. हा युद्धविराम वाढवण्याची घोषणा त्यांनी केली. हा संघर्ष कायमस्वरूपी संपुष्टात आणण्यासाठी इराण योग्य प्रस्ताव सादर करेपर्यंत हा युद्धविराम सुरू राहील, असे त्यांनी स्पष्ट केले.
शुक्रवारपासून चर्चेची शक्यता
‘न्यूयॉर्क पोस्ट’ने दिलेल्या माहितीनुसार, मध्यस्थीच्या प्रयत्नांना यश येत असून पुढच्या 72 तासांत दोन्ही देशांच्या प्रतिनिधींमध्ये चर्चा सुरू होण्याची शक्यता आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनीही त्यास दुजोरा दिला. शुक्रवारपासून पुन्हा दोन्ही देश चर्चेच्या टेबलावर येतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
अमेरिकेचा प्रस्ताव धुडकावला
अमेरिकेचा चर्चेचा प्रस्ताव इराणने धुडकावला आहे. इराणला अणुहट्ट सोडावाच लागेल असे ट्रम्प यांचे म्हणणे आहे, मात्र ट्रम्प यांच्या अटींवर कुठलीही चर्चा होणार नाही. होर्मुझवर इराणचे पूर्ण नियंत्रण आणि अण्वस्त्र कार्यक्रमावर कोणतीही तडजोड होणार नाही, असे इराणने पुन्हा स्पष्ट केले आहे.
इराणने दाखवली लष्करी ताकद
इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सने आज क्षेपणास्त्रे आणि मोबाइल लाँचर रस्त्यावर आणून अमेरिकेसह जगाला आपली ताकद दाखवली. यावेळी हजारो नागरिक हातात एके 47 रायफली घेऊन रस्त्यावर उतरले होते. इराणने अमेरिकेला दिलेला हा इशाराच मानला जात आहे.
Comments are closed.