होर्मुझमध्ये इराणचा हिंदुस्थानी जहाजांवर गोळीबार; एक निसटले, 13 जहाजांची माघार

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

इराण-अमेरिकेमध्ये युद्धविराम सुरू असतानाच होर्मुझच्या सामुद्रधुनीत आज टेन्शन वाढवणारी घटना घडली. हा मार्ग बंद करण्याची घोषणा केल्यानंतरही येथून प्रवास करणाऱया हिंदुस्थानी जहाजांवर इराणच्या लष्कराने गोळीबार केला. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे 13 जहाजांना माघार घ्यावी लागली, तर एक जहाज हिंदुस्थानच्या दिशेने निसटण्यात यशस्वी झाले.

इस्रायल-लेबनॉनमध्ये युद्धविराम झाल्यानंतर इराणने शुक्रवारी होर्मुझ सामुद्रधुनी खुली करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, ट्रम्प यांनी आज इराणला डिवचले. करार झाला नाही तर पुन्हा बॉम्बवर्षाव करू, असे ते म्हणाले. त्यामुळे खवळलेल्या इराणने अवघ्या 24 तासांच्या आत होर्मुझ पुन्हा बंद केली.

पहिला फटका हिंदुस्थानला

होर्मुझ पुन्हा बंद केल्याचा इराणचा पहिला फटका हिंदुस्थानला बसला. कच्चे तेल, खते आणि एलपीजीने भरलेली 14 जहाजे होर्मुझ ओलांडताना इराणी लष्कराच्या तावडीत सापडली. आयआरजीसीने यातील दोन जहाजांवर गोळीबार केला. एका जहाजाला गोळ्या लागल्या, मात्र सुदैवाने कुणीही जखमी झाले नाही. इराणच्या हल्ल्यातून एक जहाज कसेबसे निसटले, पण अन्य 13 जहाजांना मागे फिरावे लागले. यातील सात जहाजे हिंदुस्थानी, चार लायबेरियाची, दोन मार्शल आयलँडची आणि एक व्हिएतनामचे होते.

अमेरिकेला इशारा… तुम्हाला नेस्तनाबूत करू!

इराणवर बॉम्ब टाकण्याची धमकी देणाऱया डोनाल्ड ट्रम्प यांना इराणने जबरदस्त प्रत्युत्तर दिले. ‘संघर्ष चिघळू नये अशी आमची इच्छा आहे, पण आम्हाला डिवचल्यास अमेरिकेला नेस्तनाबूत करून टाकू,’ असा इशारा इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सने (आयआरजीसी) दिला. अमेरिकेसोबत दुसऱया फेरीच्या चर्चेची कुठलीही तारीख ठरलेली नाही, असे इराणचे उप परराष्ट्र मंत्री सईद खातिबजादेह यांनी स्पष्ट केले. ‘होर्मुझमध्ये अमेरिकेच्या मर्जीने काहीही होणार नाही. ते आमच्यावर काहीही लादू शकत नाहीत. चर्चाही लादू शकत नाही. चर्चेची नेमकी चौकट ठरेपर्यंत तारीख ठरणार नाही,’ असेही खातिबजादेह यांनी ठणकावले.

Comments are closed.