इस्रायलसह आखाती देशांत इराणचा मिसाईल मारा, जेरुसलेम चार स्फोटांनी हादरले… दुबई, बहरीनला दणका; ट्रम्प यांच्या धमकीला धमाक्यांनी प्रत्युत्तर

इराणला अश्मयुगात पाठवण्याच्या डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीला इराणने आज जोरदार धमाक्यांनी प्रत्युत्तर दिले. इराणच्या लष्कराने इस्रायलसह आखाती देशात मिसाईलचा अक्षरशः मारा केला. इस्रायलचे प्रमुख शहर जेरुसलेम चार स्फोटांनी हादरले, तर दुबई व बहरीनमध्येही हल्ले करण्यात आले. जॉर्डनमधील अमेरिकी तळावरील लढाऊ विमानांवर ड्रोन हल्ले चढवण्यात आले.

देशाला संबोधून केलेल्या भाषणात डोनाल्ड ट्रम्प यांनी आज इराणला अश्मयुगात पाठवण्याची धमकी दिली. ‘इराणविरुद्धच्या युद्धात अमेरिकेने बरीच मजल मारली आहे. आपला हेतू साध्य झाला आहे. तरीही इराणवर हल्ले सुरूच राहतील. पुढचे दोन-तीन आठवडे जोरदार हल्ले करू,’ असे ट्रम्प म्हणाले. त्यांचे भाषण सुरू असतानाच दुबई स्फोटांनी हादरली. जेरुसलेममध्येही मिसाईल हल्ला झाल्याने आपत्कालीन सायरन वाजले. त्यानंतर अर्ध्या तासातच बहरीनमध्ये अमेरिकी नौदल तळावर स्फोटांनी गोंधळ उडाला, तर रात्री उशिरा जॉर्डनमध्ये असलेल्या अमेरिकेच्या अल अझरक हवाई तळावरील लढाऊ विमानांवर ड्रोन हल्ले करून इराणने ट्रम्प यांच्या धमकीची हवाच काढून टाकली.

ताकदीच्या बळावर होर्मुझ खुली करणे चुकीचे ठरेल! – मॅक्रॉन

लष्करी बळाचा वापर करून होर्मुझ सामुद्रधुनी खुली करण्याचा पर्याय अव्यवहार्य ठरेल, असे स्पष्ट मत फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी आज मांडले. ‘होर्मुझसाठी लष्करी कारवाईला आमचा कधीच पाठिंबा नसेल. शिवाय तसे झाल्यास होर्मुझचा वापर करणाऱया देशांना इराणी लष्कराच्या हल्ल्यांचा सामना करावा लागेल. त्यामुळे इराणशी चर्चेतूनच ते होईल,’ असे मॅक्रॉन म्हणाले.

70 लाख इराणी शस्त्र हाती घेण्यास सज्ज

इराणच्या भूमीवर उतरण्याच्या अमेरिकेच्या धमकीला इराणी संसदेचे प्रवक्ते मोहम्मद बागेर गालीबफ यांनी उत्तर दिले आहे. ‘इराणमधील 70 लाख नागरिक अमेरिकेविरोधात लढण्यासाठी शस्त्र हाती घेण्यास तयार आहेत, असा दावा गालीबफ यांनी केला. इराणी फक्त देशाच्या संरक्षणाच्या गप्पा मारत नाहीत. प्रसंगी ते रक्त वाहतात. याआधीही आम्ही ते केले आहे, आताही तयार आहोत. तुम्ही फक्त आमच्या भूमीवर पाय ठेवून बघा. आमचं संपूर्ण कुटुंब तुम्हाला सामोरं जाईल,’ असा सूचक इशारा गालीबफ यांनी दिला.

आमच्या प्रिय, सन्माननीय आणि मुस्लिम राष्ट्रावर आक्रमण करून तुम्ही जी चूक केलीय त्याची किंमत तुम्हाला मोजावीच लागेल. आमची ताकद आणि युद्ध क्षमतेबद्दल तुम्हाला काहीच कल्पना नाही.’ – इब्राहिम झुल्फकरी प्रवक्ते, आयआरजीसी

आम्हाला सात हजार वर्षांचा इतिहास धमक्या कसल्या देता!

ट्रम्प यांच्या धमकीला इराणी लष्कराचे कमांडर सय्यद माजिद मुसावी यांनी ‘एक्स’ पोस्ट करून सडेतोड उत्तर दिले. ‘हॉलीवूडच्या भ्रामक सिनेमांनी तुमची मने इतकी विषारी करून टाकली आहेत की, तुम्ही स्वतःची ओळख विसरला आहात. अवघा 250 वर्षांचा किरकोळ इतिहास तुम्हाला आणि तुम्ही आम्हाला धमक्या देता. इराणला सात हजार वर्षांचा इतिहास आहे. अशा प्राचीन संस्कृतीला अश्मयुगात नेण्याची भाषा करता? खरंतर, मुलांची हत्या आणि मानवतेविरुद्ध अश्मयुगात होणारे गुन्हे तुम्ही आधुनिक जगात घेऊन आला आहात,’ अशा शब्दांत मुसावी यांनी अमेरिकेला सुनावले.

होर्मुझसाठी थेट आमच्याशी बोला; इराणची भूमिका

‘होर्मुझची सामुद्रधुनी आमच्या पूर्ण नियंत्रणात आहे. या मार्गाचे भविष्य काय असेल याचा निर्णय फक्त इराण आणि ओमान करतील. दुसरा-तिसरा कुणीही नाही. कोणाच्याही दबावाला बळी पडून किंवा कुणाशी वाटाघाटी करून शत्रूसाठी हा मार्ग खुला केला जाणार नाही,’ असे इराणने आज ठणकावले. ‘युरोपीय देशांना होर्मुझचा मार्ग खुला करून हवा असेल तर त्यांना थेट आमच्याशी बोलावे लागेल, करार करावा लागेल. आम्ही त्यांचे स्वागत करू,’ अशी भूमिका इराणने आज मांडली.

‘होर्मुझ’च्या मुद्दय़ावर 40 देशांची चर्चा

होर्मुझचा मार्ग खुला करण्यासाठी 40 देशांनी चर्चा सुरू केली आहे. ब्रिटनने यासाठी पुढाकार घेतला आहे. यासंदर्भात गुरुवारी एक व्हर्च्युअल बैठक घेण्यात आली. ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी, पॅनडा आणि हिंदुस्थानसह 40 देश या बैठकीत सहभागी झाले होते. अमेरिका मात्र या बैठकीत सहभागी झाली नाही.

अश्मयुगात पाठवू

डोनाल्ड ट्रम्प यांनी आज पुन्हा इराणला धमकी दिली. ‘इराणविरुद्धच्या युद्धात अमेरिकेने मजल मारली आहे. हेतू साध्य झाला आहे. तरीही इराणवर हल्ले सुरूच राहतील. दोन-तीन आठवडे हल्ले करून इराणला पुन्हा अश्मयुगात पाठवू,’ असे ट्रम्प म्हणाले.

ऑस्ट्रियाचाही अमेरिकेला मदत करण्यास नकार

इराणविरुद्ध लष्करी कारवाईसाठी अमेरिकेला हवाई हद्द खुली करून देण्यास नकार देत ऑस्ट्रियानेही तटस्थतेची भूमिका आज घेतली.

Comments are closed.