Iran Israel War – बॅडमिंटनपटू पी.व्ही सिंधू दुबईत अडकली, All England Open 2026 स्पर्धेला मुकणार!

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

ऑलिम्पिक पदक विजेती पी.व्ही.सिंधू दुबईत अडकली आहे. रविवारी (1 मार्च 2026) पी.व्ही.सिंधू प्रशिक्षकासोबत दुबई विमानतळावर पोहोचली होती. मात्र, त्याचवेळी दुबई विमानतळाच्या परिसरात मोठा धमाका झाला आणि या धमाक्यात ती थोडक्यात वाचली. त्यानंतर त्यांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. 3 तारखेपासून All England Open Badminton Championships 2026 सुरू होणार असून सिंधूला या स्पर्धेसाठी इंग्लंडला पोहचायचं आहे. मात्र, सध्याची परिस्थिती पाहता तिला या स्पर्धेला मुकाव लागण्याची शक्यता आहे.

इराण आणि इस्रायल यांच्यामध्ये सुरू असलेलं युद्ध आणखी भयंकर होत चाललं आहे. त्यामुळे दुबईसह अनेक मोठी विमानतळ सध्या बंद करण्यात आली आहेत. इराणने आखाती देशातील अमेरिकेच्या आठ तळांना लक्ष्य करत सौदी अरब, कतार, कुवेत, बहरीन, अबुधाबी, दुबई, इराक आणि जॉर्डन येथे हवाई हल्ले केले. याचा फटका दुबईत पर्यटनासाठी आलेल्या परदेशी नागरिकांना आणि खेळाडूंनाही बसला आहे. पी.व्ही.सिंधू सध्या आपल्या प्रशिक्षक इरवांस्य आदि प्रतामा यांच्यासोबत दुबईमध्ये सुरक्षित ठिकाणी आहे.

दरम्यान, All England Open Badminton Championships 2026 बर्मिंगहमध्ये 3 ते 8 मार्च दरम्यान रंगणार आहे. या स्पर्धेसाठी पी.व्ही. सिंधुला इंग्लंडला जायचं होतं. या स्पर्धेत पी.व्ही. सिंधुचा पहिला सामना थायलंडच्या सुपानिदा काटेथोंगविरुद्ध होणार होता. दुसरीकडे इतर खेळाडू सिंगापूर आणि आफ्रिकेच्या मार्गे बर्मिंगहममध्ये दाखल झाले आहेत. हिंदुस्थानचा स्टार बॅडमिंटनपटू लक्ष्य सेन आणि युवा आयुष शेट्टी हे दोघेही स्पर्धेसाठी इंग्लंडमध्ये पोहोचले आहेत.

Comments are closed.