Israel Iran War – होर्मुझचे नेतृत्व करणारे इराणचे नौदल कमांडर तांगसिरींचा हल्ल्यात मृत्यू; इस्रायलचा दावा
होर्मुझ नाकेबंदीचे नेतृत्व करणारे इराणचे नौदल कमांडर अलीरेझा तांगसिरी यांचा हल्ल्यात मृत्यू झाल्याचा दावा इस्रायलने केला आहे. होर्मुझ सामुद्रधुनी बंद ठेवण्याची जबाबदारी अलीरेझा तांगसिरी यांच्यावर होती, असे इस्रायली अहवालांमध्ये नमूद करण्यात आले आहे. या घटनेबाबत इराणकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.
इस्रायली प्रसारमाध्यमांनी एका इस्रायली अधिकाऱ्याचा हवाला देत दिलेल्या वृत्तानुसार, ‘इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स’चे (IRGC) नौदल कमांडर अलीरेझा तांगसिरी यांचा अब्बास बंदर येथे झालेल्या अमेरिका-इस्रायलच्या हल्ल्यात मृत्यू झाला आहे. ‘टाइम्स ऑफ इस्रायल’च्या एका अहवालानुसार, होर्मुझ सामुद्रधुनी (Strait of Hormuz) बंद ठेवण्याची जबाबदारी तांगसिरी यांच्यावर होती.
या हल्ल्याबाबत इराणकडून किंवा इस्रायली लष्कराकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. अमेरिका आणि इस्रायलने केलेल्या हत्येच्या प्रयत्नांतून आतापर्यंत बचावलेल्या मोजक्याच मोठ्या नावांपैकी तांगसिरी हे एक होते. २०१८ पासून या पदावर कार्यरत असलेले हे अनुभवी कमांडर असून, होर्मुझ सामुद्रधुनी बंद ठेवण्याच्या इराणच्या रणनीतीत त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती.
इराणचे ज्येष्ठ सर्वोच्च नेते, तसेच इतर अनेक उच्चपदस्थ अधिकारी आणि रिव्होल्युशनरी गार्ड्सचे कमांडर यांचा यापूर्वीच अमेरिका-इस्रायलच्या हल्ल्यांमध्ये मृत्यू झाला आहे. तरीही २८ फेब्रुवारी रोजी सुरू झालेल्या या युद्धात, रणनीती आखण्याची आणि प्रत्यक्ष कारवाई करण्याची आपली क्षमता इराणच्या सत्ताधाऱ्यांनी अद्यापही कायम राखली आहे.
Comments are closed.