अमेरिकी सैन्याला शोधूनही सापडले नाहीत इराणचे भूसुरुंग; फोटो व्हायरल झाल्याने जगाचे टेन्शन वाढले
अमेरिका आणि इराण यांच्यातील सध्याच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर ओमानच्या सागरी हद्दीतून जगाची चिंता वाढवणारी माहिती मिळाली आहे. होर्मुझच्या सामुद्रधुनीचे काही फोटो व्हायरल झाले आहेत, त्यात इराणी नौदलाने पेरलेले संशयित भूसुरुंग दिसत असल्याचा दावा करण्यात आला आहे. हे इराणचे ‘महाम-३’ नौदल सुरुंग असू शकतात, ज्यांचे वजन अंदाजे ३०० किलोग्रॅम असल्याचे सांगितले जात आहे. या माहितीची पुष्टी अधिकृतपणे करण्यात आलेली नाही. मात्र, यामुळे जगाचे टेन्शन वाढले आहे.
या घडामोडीमुळे समुद्रातील सुरक्षेबाबत नवीन चिंता निर्माण झाली आहे. सतत शोधमोहीम राबवूनही अमेरिकन नौदलाला अद्याप या सुरुंगांची निश्चितपणे ओळख पटवता आलेली नाही. त्यामुळे व्हायरल झालेले फोटो अमेरिकेसाठी एक मोठा धक्का मानले जात आहेत. अमेरिकन नौदल होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये सतत शोधमोहीम राबवत आहे. तरीही त्यांच्या हातील काहीही लागलेले नाही.
हे खरोखरच महाम-३ सुरुंग असतील, तर ते आंतरराष्ट्रीय सागरी मार्गांच्या सुरक्षेसाठी गंभीर धोका निर्माण करू शकतात. त्यामुळे अमेरिका आणि इराण यांच्यातील तणाव एका धोकादायक वळणावर पोहोचत असल्याचे दिसत आहे. त्यातच इराणने शांतता करार करावा यासाठी अमेरिकेकडून दबावतंत्राचा वापर करण्यात येत आहे. जर या दोन्ही देशांमधील शांतता चर्चा फिस्कटली तर या सुरुंगामुळे सागरी वाहतुकीला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागणार आहे.
अमेरिकेच्या सततच्या धमक्यांमुळे आता इराण संभाव्य ड्रोन युद्धाची तयारी वेगाने करत असल्याची माहिती मिळत आहे. इराणच्या संरक्षण मंत्रालयाने ड्रोन सहाय्यता केंद्राच्या स्थापनेची घोषणा केली आहे. इराणी संरक्षण मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, लवकरच एक विशेष ड्रोन सहाय्यता केंद्र स्थापन केले जाईल. हे केंद्र सरकारी आणि लष्करी अशा दोन्ही संघटनांना ड्रोनशी संबंधित सर्व नागरी सेवा पुरवेल.
या सर्व घडामोडींमुळे अमेरिका आणि इराण यांच्यातील वाढता तणाव कोणत्याही क्षणी मोठ्या लष्करी संघर्षात बदलू शकतो. अमेरिकेचे संरक्षण सचिव पीट हेगसेथ यांनी म्हटले आहे की, जर इराणसोबत करार झाला नाही, तर अमेरिका पुन्हा हल्ले करण्यास तयार आहे. तथापि, त्यांनी असेही सांगितले की दोन्ही देशात चर्चा सुरू असून, दोन्ही बाजू महत्त्वाचे मतभेद सोडवण्याचा प्रयत्न करत आहेत. तणाव कमी करण्यासाठी गेल्या दीड महिन्यापासून वाटाघाटी सुरू आहेत.
Comments are closed.