थेट आमच्याशी व्यवहार करा, ‘होर्मुझ’मधून तेल पुरवठ्यासाठी अमेरिकेची गरज नाही; इराणची ऑफर

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणचे पूर्ण नियंत्रण असून जगातील ज्या देशांना या मार्गावरून तेल आणि गॅसचा पुरवठा हवा आहे, त्यांनी अमेरिकेची मध्यस्थी न घेता थेट इराणशी करार करावा, अशी खुली ऑफर इराणने दिली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी होर्मुझ संकटातून अमेरिकेला बाजूला काढण्याचे संकेत दिल्यानंतर इराणने जागतिक स्तरावर ही मोठी खेळी खेळली आहे.

इराणच्या माहिती परिषदेचे प्रमुख इलियास हजरती यांनी यासंदर्भात स्पष्ट भूमिका मांडली आहे. ते म्हणाले की, होर्मुझच्या जलमार्गाच्या वापरासाठी इराण युरोपीय, आशियाई आणि अरब देशांसोबत स्वतंत्र करारांवर चर्चा करण्यास तयार आहे. ट्रम्प या विषयावर दिशाभूल करणारी विधाने करत असले तरी, या व्यापारी मार्गावर आमचेच वर्चस्व आहे, हे जगाला ठाऊक आहे. त्यामुळे ज्या देशांना आपला व्यापार सुरळीत सुरू ठेवायचा आहे, त्यांनी इराणसोबत थेट करारावर स्वाक्षरी करावी.

यापूर्वी इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनीही हा मार्ग ओमान आणि इराणच्या सीमेत येत असल्याने येथील नियम ठरवण्याचा अधिकार याच दोन देशांना असल्याचे म्हटले होते. इराण आता या मार्गावरून जाणाऱ्या मालवाहू जहाजांवर टोल प्रणाली लागू करण्याच्या तयारीत आहे. तसा प्रस्ताव इराणच्या संसदेतही मांडण्यात आला असून, त्याद्वारे प्रत्येक जहाजाकडून कायदेशीर शुल्क वसूल करण्याचा इराणचा मानस आहे.

Comments are closed.