Iran Israel War – होर्मुझची सामुद्रधुनी कोणाचीही मक्तेदारी नाही, दादागिरी खपवून घेणार नाही; इराणने अमेरिकेला सुनावले
होर्मुझची सामुद्रधुनी ही केवळ अमेरिकेची मक्तेदारी नसून ती जगातील सर्व देशांसाठी आहे, अशा स्पष्ट शब्दांत इराणने अमेरिकेला सुनावले आहे. हिंदुस्थानातील इराणच्या सर्वोच्च नेत्यांचे प्रतिनिधी डॉ. अब्दुल माजिद हकीम इलाही यांनी हे खडे बोल सुनावले आहेत. आखातामध्ये अमेरिकन जहाजांच्या उपस्थितीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत त्यांनी अमेरिकेने हा परिसर तात्काळ सोडावा, असा कठोर इशाराही दिला आहे. आम्हाला हा जलमार्ग सर्वांसाठी खुला ठेवायचा आहे, मात्र सध्याची परिस्थिती चिंताजनक असून केवळ ठराविक जहाजांना या मार्गावरून प्रवासाची परवानगी दिली जात असल्याचे त्यांनी सांगितले.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी होर्मुझच्या सामुद्रधुनीवर नाकेबंदी करण्याची घोषणा केल्यानंतर या प्रदेशातील तणाव कमालीचा वाढला आहे. या पार्श्वभूमीवर इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड नेव्हीने आक्रमक पवित्रा घेतला असून, या जलमार्गाजवळ येणाऱ्या कोणत्याही लष्करी जहाजाला कारवाईद्वारे चोख प्रत्युत्तर दिले जाईल, असा इशारा दिला आहे. डॉ. इलाही यांनी ट्रम्प यांच्या विधानाचा संदर्भ देत जागतिक नेत्यांना आणि युद्धात सहभागी असलेल्या सर्व पक्षांना एकत्र येऊन युद्ध थांबवण्याचे आवाहन केले आहे.
इस्लामाबादमधील चर्चेच्या अपयशावर भाष्य करताना डॉ. इलाही म्हणाले की, इराण आजही संवादासाठी पूर्णपणे तयार आहे. मात्र, ही चर्चा तर्कसंगत असायला हवी आणि त्यामध्ये इराणची प्रतिष्ठा, मानवाधिकार आणि हक्कांचा आदर राखला जाणे आवश्यक आहे. इराणने कधीही वाटाघाटींचा मार्ग सोडलेला नाही, उलट अमेरिकेनेच अवाजवी मागण्या केल्याने शांतता करार होऊ शकला नाही, असा दावाही त्यांनी यावेळी केला.
Comments are closed.