Iran Israel war – इराणचे नवे नेतृत्व जास्त काळ टिकणार नाही….डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला इशारा

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा इस्रायली-अमेरिकन हल्ल्यात मृत्यू झाल्यानंतर, त्यांच्या जागी त्यांचे पुत्र मोज्तबा खामेनी यांची नवे सर्वोच्च नेते म्हणून निवड करण्यात आली आहे. इराणमधील या सत्तांतराच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अत्यंत कडक भूमिका घेतली असून, अमेरिकेच्या मान्यतेशिवाय इराणचे नवे नेतृत्व जास्त काळ टिकणार नाही, असा इशारा दिला आहे.

अध्यक्ष ट्रम्प यांनी मोज्तबा खामेनी यांची निवड अमान्य करताना त्यांना ‘अक्षम’ आणि ‘कमकुवत’ म्हटले आहे. इराणला दर दहा वर्षांनी अण्वस्त्र निर्मितीची संधी मिळेल किंवा अमेरिकेच्या हिताला बाधा येईल असे कोणतेही पाऊल उचलले जाऊ नये, यासाठी अमेरिका इराणच्या पुढील नेतृत्वाच्या निवडीत महत्त्वाची भूमिका बजावेल, असे ट्रम्प यांनी स्पष्ट केले. इराणने बिनशर्त आत्मसमर्पण केल्याशिवाय कोणताही करार होणार नाही, असेही त्यांनी सोशल मीडियाद्वारे ठामपणे सांगितले. जर इराणने योग्य नेत्याची निवड केली, तरच अमेरिका त्या देशाला विनाशाच्या उंबरठ्यावरून बाहेर काढून आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी मदत करेल, असे आश्वासनही त्यांनी दिले.

दुसरीकडे, इराणच्या सर्वोच्च राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे सचिव अली लारीजानी यांनी ट्रम्प यांच्या विधानाचा तीव्र शब्दात निषेध केला आहे. आपल्या नेत्याच्या आणि जनतेच्या रक्ताचा निर्दयीपणे बदला घेतला जाईल आणि ट्रम्प यांना याची किंमत मोजावी लागेल, असे लारीजानी यांनी म्हटले आहे. दरम्यान, इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी स्पष्ट केले की, तेहरान आपल्या अंतर्गत बाबींमध्ये कोणालाही हस्तक्षेप करू देणार नाही आणि कोणताही दबाव न स्वीकारता प्रतिकार सुरूच ठेवेल.

Comments are closed.