स्वतःचेच भूसुरुंग शोधण्यात इराण असमर्थ; होर्मुझ सामुद्रधुनीबाबत अमेरिकेचा नवा दावा
इराणने पेरलेले स्वतःचेच सागरी सुरुंग त्यांना शोधता येत नसल्यामुळे ते होर्मुझची सामुद्रधुनी पूर्णपणे खुली करू शकत नाही, असा नवा दावा अमेरिकेने केला आहे. अमेरिकन अधिकाऱ्यांच्या मते ट्रम्प प्रशासनाच्या मागण्या इराण त्वरीत पूर्ण करू शकत नाही, याचे हेच मुख्य कारण आहे. या महत्त्वपूर्ण जलमार्गातून इराणने जहाजांची वाहतूक पूर्ववत सुरू करावी, अशी अमेरिकेची प्रमुख मागणी आहे.
ही समस्या शांतता चर्चेसाठीही एक आव्हान ठरत आहे. पाकिस्तानमधील इस्लामाबाद येथे इराणी वाटाघाटीकार आणि अमेरिकेचे उपराष्ट्रपती जे. डी. व्हान्स यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ यांच्यात शांतता चर्चा होत आहे. दोन्ही बाजू युद्ध थांबवून कायमस्वरुपी शांतता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, या चर्चेत होर्मुझ मुद्दा एक मोठा अडथळा बनला आहे.
अमेरिकेचा दावा आहे की, इराणला होर्मुझच्या सामुद्रधुनीतील स्वतःचेच भूसुरुंग शोधता येत नाहीत आणि ते हटवण्याची क्षमताही त्याच्याकडे नाही. त्यामुळे, इराण हा सागरी मार्ग पूर्णपणे खुला करू शकत नाही. होर्मुझची सामुद्रधुनी तात्काळ आणि सुरक्षितपणे खुली केली पाहिजे, ही युद्धविरामासाठी ट्रम्प यांची अट आहे. या मुद्द्यावर पाकिस्तानात शांतता चर्चा सुरू आहे.
पाण्याखालील सुरुंग जहाजे आणि पाणबुड्यांसाठी प्राणघातक असतात. होर्मुझची सामुद्रधुनी हा जगातील सर्वात महत्त्वाचा जलमार्ग आहे. जगातील जवळपास एक-पंचमांश कच्चे तेल या सागरी मार्गातून जाते. हा मार्ग बंद झाला किंवा जहाजांची वाहतूक कमी झाली, तर जागतिक तेलाच्या किमती गगनाला भिडतात. गेल्या महिन्यात अमेरिका आणि इस्रायलने केलेल्या हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून इराणने लहान बोटींचा वापर करून या सागरी मार्गात भूसुरुंग पेरले.
इराणने ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ल्यांची धमकीही दिली. परिणामी, तेलवाहू जहाजे आणि इतर जहाजांची वाहतूक जवळजवळ थांबली. यामुळे जगभरात ऊर्जेच्या किमतीत मोठी वाढ झाली. यामुळे इराणला युद्धातील सर्वात महत्त्वाचे शस्त्र मिळाले. इराणने काही जहाजांना टोल देऊन एक अरुंद मार्ग खुला ठेवला होता, परंतु संपूर्ण सागरी मार्ग सुरक्षित नव्हता.
अमेरिकन अधिकाऱ्यांच्या मते, इराणने अंदाधुंद आणि अनियमितपणे सागरी सुरुंग पेरले. अनेक भूसुरुंगांची नोंद ठेवली गेली नाही. जिथे नोंदी ठेवल्या होत्या, तिथेही काही सुरुंग वाहून गेले किंवा त्यांच्या जागेवरून हलवले गेले. आता, किती भूसुरुंग आहेत याची इराणला काहीच कल्पना नाही, असाअमेरिकेचा दावा आहे.
इराणच्या इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सने (IRGC) इशारा दिला आहे की जहाजांना भूसुरुंगांचा सामना करावा लागू शकतो. त्यांनी काही सुरक्षित मार्गांचे नकाशेही प्रसिद्ध केले आहेत, परंतु हे मार्ग खूपच मर्यादित आहेत. सुरुंग पेरण्यापेक्षा ते काढणे हे खूपच अवघड काम आहे. अगदी अमेरिकन सैन्याकडेही भूसुरुंग वेगाने हटवण्याची पूर्ण क्षमता नाही. इराणकडे तर त्याहूनही कमी सुविधा आहेत.
इराणकडे शेकडो लहान बोटी आहेत ज्या जहाजांच्या मार्गात अडथळा ठरू शकतात किंवा नवीन सुरुंग पेरू शकतात. अमेरिकेने इराणची अनेक नौदल जहाजे बुडवली आहेत आणि नौदल तळांवर हल्ला केला आहे, परंतु या लहान बोटी पूर्णपणे नष्ट करणे आहे, त्यामुळे नवा पेच उभा ठाकला आहे.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावर लिहिले की, जर होर्मुझची सामुद्रधुनी पूर्णपणे, तात्काळ आणि सुरक्षितपणे उघडली गेली, तरच दोन आठवड्यांचा युद्धविराम शक्य आहे. इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी सांगितले की, तांत्रिक मर्यादा लक्षात घेऊन होर्मुझची सामुद्रधुनी उघडण्यात येईल.
अमेरिकेच्या अधिकाऱ्यांच्या मते, तांत्रिक मर्यादा म्हणजे भूसुरुंग शोधून ते हटवण्यास इराणची असलेली असमर्थता होय. हा मुद्दा आता इस्लामाबादमध्ये सुरू असलेल्या चर्चेचा मुख्य विषय असेल. अमेरिका अधिक जहाजांसाठी सुरक्षित मार्गाची मागणी करत आहे, तर इराण आपल्या स्वतःच्या तांत्रिक समस्यांचा हवाला देत आहे. सुरुंगक्षेत्रांमुळे होर्मुझच्या सामुद्रधुनीचा प्रश्न सोडवणे सोपे नाही. दोन्ही पक्षांकडे सुरुंग हटवण्याची मर्यादित क्षमता आहे. जर लवकरच सुरक्षित मार्ग खुला झाला नाही, तर तेलाच्या किमती पुन्हा वाढू शकतात.
Comments are closed.