१९ दिवस, २००० हून अधिक हल्ले; अमेरिका-इस्रायल-इराण युद्धाचे धडकी भरवणारे आकडे समोर
अमेरिका आणि इस्रायलविरुद्ध सुरू असलेल्या इराणच्या युद्धाला आज १९ दिवस पूर्ण झाले आहेत. मात्र हा संघर्ष थांबण्याऐवजी दिवसेंदिवस अधिक भयावह होत चालला आहे. ताज्या आकडेवारीनुसार, गेल्या तीन आठवड्यांत दोन्ही बाजूंकडून २,००० पेक्षा जास्त हल्ले नोंदवले गेले असून, यामुळे संपूर्ण पश्चिम आशिया युद्धाच्या उंबरठ्यावर उभा आहे.
‘एसीलेड’ (ACLED) या जागतिक स्तरावर युद्धाचा डेटा गोळा करणाऱ्या संस्थेच्या आकडेवारीनुसार, २८ फेब्रुवारीपासून आतापर्यंत एकूण २,१७८ हल्ले झाले आहेत. इराणमधील लष्करी आणि औद्योगिक तळांवर अमेरिका-इस्रायलने १,३९४ हल्ले केले आहेत. तर इराण आणि त्याच्या मित्र राष्ट्रांनी (प्रोक्सी ग्रुप्स) ७८४ वेळा प्रत्युत्तर दिले आहे. इराणची राजधानी तेहरानवर आतापर्यंत ४६० हून अधिक हल्ले झाले आहेत, जे एकूण हल्ल्यांच्या एक तृतीयांश आहेत.
युद्ध १३ देशांमध्ये पसरले
हे युद्ध केवळ इराण आणि इस्रायलपुरते मर्यादित राहिलेले नाही. इराणने आखाती देशांमधील अमेरिकन लष्करी तळांना लक्ष्य केल्यामुळे या संघर्षाची झळ आता बहरीन, इराक, कुवैत, कतार, सौदी अरब आणि यूएईसह १३ देशांना बसत आहे. इस्त्रायलवरही आतापर्यंत २५० हल्ले झाले आहेत.
जागतिक अर्थव्यवस्थेला मोठा फटका
युद्धाचा सर्वात मोठा परिणाम कच्च्या तेलाच्या किमतींवर झाला आहे. जागतिक ऊर्जा पुरवठ्याचा मुख्य मार्ग असलेल्या होर्मुजच्या सामुद्रधुनीवर (Strait of Hormuz) वारंवार होणाऱ्या हल्ल्यांमुळे तेलाच्या किमतीत ४२ टक्क्यांनी वाढ झाली आहे. ब्रेंट क्रूडचा दर ७२.५० डॉलरवरून थेट १०३ डॉलर प्रति बॅरलच्या पुढे गेला आहे.
Comments are closed.