आखातात युद्धाचा भडका; हिंदुस्थानात उसळणार महागाईचा आगडोंब, होर्मुझ सामुद्रधुनी बंद! इंधन पेटणार, पेट्रोल दोनशेपार जाणार

अमेरिका-इस्रायल आणि इराण युद्धाचा आखातात मोठा भडका उडाला आहे. खामेनी मारले गेल्यामुळे खवळलेल्या इराणने ‘मरू पण झुंजू’ असा पवित्रा घेतला असून जगातील तेलवाहतुकीचा महत्त्वाचा मार्ग असलेली होर्मुझची सामुद्रधुनी बंद केली आहे. त्याचा मोठा फटका तेल पुरवठ्याला बसला आहे. त्यामुळे इंधनाचे भाव भडकणार असून पेट्रोल दोनशे पार जाण्याची भीती आहे. देशात महागाईचा आगडोंब उसळण्याची शक्यता आहे. दरम्यान, इराणमधील शाळेवर झालेल्या हल्ल्यात 153 विद्यार्थिनींचा मृत्यू झाला आहे. हजारोंच्या उपस्थितीत सर्व मृतांची आज एकाच वेळी अंत्ययात्रा काढण्यात आली. हे दृश्य पाहून अवघे जग स्तब्ध झाले. आतापर्यंत इराणमध्ये 787 हून अधिक लोक ठार झाले आहेत.

अण्वस्त्र प्रसाराच्या मुद्दय़ावरून अमेरिका-इस्रायल व इराणमध्ये सुरू झालेले युद्ध चौथ्या दिवशी अधिकच पेटले असून दोन्ही बाजूंकडून एकमेकांवर संहारक बॉम्बचा अक्षरशः वर्षाव सुरू आहे. अमेरिका-इस्रायल इराणवर आग ओकत असून त्यांना प्रत्युत्तर इराण आखाती देशांतील अमेरिकेचे लष्करी तळ, विमानतळे, तेल रिफायनरींना लक्ष्य करत आहे. त्यामुळे संपूर्ण आखातावर स्मशानकळा पसरली आहे. अमेरिका-इस्रायलला नुसता तोंडी पाठिंबा देणाऱया देशांनाही इराणने लक्ष्य केले असून ब्रिटनच्या सायप्रस येथील हवाई तळावर हल्ला केला आहे. बॉम्बहल्ल्यांमुळे अनेक ठिकाणी आगी लागल्या असून आखाताच्या आकाशात धुराचे लोट उसळले आहेत. या युद्धात काही अमेरिकी नागरिकही मारले गेले आहेत. आणखी काही अमेरिकी नागरिकांना जीव गमवावा लागू शकतो, असे डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे.

इस्रायलचे सैन्य लेबनॉनमध्ये घुसले, हिजबुल्लाह लक्ष्य, 31 नागरिकांचा मृत्यू

इराणशी युद्ध सुरू असतानाच इस्रायलने हिजबुल्लाह संघटनेला लक्ष्य करत लेबनॉनमध्ये हल्ला केला आहे. इस्रायली सैन्य दक्षिण लेबनॉनमध्ये घुसले आहे. लेबनॉनमधील जास्तीत जास्त भागाचा ताबा घेण्याचे आदेश इस्रायलने त्यांच्या सैन्याला दिले आहेत. हिजबुल्लाहनेही आता संयम संपल्याचे सांगत आरपारच्या लढाईचा इशारा दिला आहे. हिजबुल्लाह आणि इस्रायली सैन्यामध्ये झालेल्या धुमश्चक्रीत आतापर्यंत 31 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 30 हजार लोकांनी आपली घरे सोडून मदत छावण्यांमध्ये आश्रय घेतला आहे.

गर्भश्रीमंतांची आखाती देशांमधून पळापळ

जगभरातील गर्भश्रीमंतांनी आखाती देशांमध्ये अब्जावधी रुपयांच्या मालमत्तांची खरेदी केली. अनेक जण तेथे स्थायिक झाले. मात्र, इराणने आखाती देशांमधील महत्त्वाच्या शहरांना लक्ष्य केल्यामुळे चैनीचे जीवन जगत असलेल्या या गर्भश्रीमंतांची आखाती देशांमधून पळण्यासाठी धावपळ सुरू आहे. वाट्टेल तेवढी किंमत मोजून हे लोक सुरक्षित ठिकाणी पलायन करीत आहेत. एका खासगी विमानासाठी तब्बल 3.5 लाख डॉलर एवढी रक्कम मोजली जात आहे. खासगी जेटचे भाडेदेखील प्रत्येक दिवशी वाढत आहे.

इराणची हवाई संरक्षण यंत्रणा उद्ध्वस्त झालीय. हवाई दल, नौदल आणि नेतृत्वही संपलंय. आता त्यांना आमच्याशी बोलायचंय. पण आता खूप उशीर झालाय. – डोनाल्ड ट्रम्प

इराणी फौजांचा इशारा, अमेरिका आणि इस्रायलसाठी जहन्नुमचे दरवाजे उघडले

इराणचे सर्व प्रकारचे नेतृत्व संपवल्याचा दावा करणाऱया डोनाल्ड ट्रम्प यांना इराणी लष्कराने जोरदार इशारा दिला. ‘अमेरिका आणि इस्रायलसाठी जहन्नुमचे आणखी दरवाजे उघडले आहेत, असे इराणच्या रेव्होल्युशनरी गार्डस्चे प्रवत्ते अली मोहम्मद नायेनी म्हणाले.

सौदीमध्ये आरामकोच्या सर्वात मोठय़ा रिफायनरीवर इराणचा ड्रोन हल्ला

अमेरिकेचे आर्थिक हितसंबंध गुंतलेल्या आखाती देशांतील तेल रिफायनरींना इराणने लक्ष्य केले आहे. इराणच्या रेव्होल्युशनरी गार्ड्सने मंगळवारी सौदीमधील अरामकोच्या ‘रास तानुरा’ या रिफायनरीवर ड्रोनचा भडिमार केला. सौदीच्या हवाई संरक्षण यंत्रणेने हे ड्रोन उद्ध्वस्त केले. मात्र, ड्रोनचे जळते तुकडे रिफायनरीवर पडल्याने तिथे आग लागली. रास तानुरा ही सौदी आरामको कंपनीची एक प्रमुख रिफायनरी असून येथून दिवसाला साडेपाच लाख बॅरल्स तेल काढले जाते. या हल्ल्यानंतर रिफायनरी तात्पुरती बंद करण्यात आली आहे.

  • आखाती देशात युद्ध भडकल्याने हिंदुस्थानची चिंता वाढली आहे. हिंदुस्थानकडे सध्या 25 दिवस पुरेल इतकाच इंधनसाठा शिल्लक आहे. हिंदुस्थान तब्बल 85 टक्के कच्चे तेल आयात करतो. त्यातील 40 टक्के कच्चे तेल इराणच्या होर्मुझ सामुद्रधुनीतून येते. इराणच्या रिव्हॉल्युशनरी गार्ड कॉर्प्सने हा मार्ग बंद केल्यामुळे या मार्गावरील तेल वाहतूक ठप्प झाली आहे. युद्ध लांबल्यास परिस्थिती अवघड होण्याची चिन्हे आहेत. या पार्श्वभूमीवर रशियाकडून तेल खरेदीचा विचार सरकारी पातळीवर सुरू आहे.

खामेनी यांचा मृतदेह आहे कुठे?

अयातुल्लाह खामेनी मारले गेल्याचे इराणसह अमेरिका व इस्रायलनेही जाहीर केले आहे. खामेनी यांचा मृतदेह ट्रम्प आणि नेतन्याहू यांना दाखवण्यात आल्याचा दावाही त्यांच्याकडून करण्यात येत आहे. मात्र, मृत खामेनी यांचे एकही अधिकृत छायाचित्र अद्याप समोर आलेले नाही. त्यामुळे त्यांचा मृतदेह नेमका आहे कुठे, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

किम जोंग यांची तयारी, इराणने फक्त सांगावं, आमच्या एका मिसाईलने अख्खा इस्रायल नष्ट करू

अमेरिक-इस्रायलने सुरू केलेल्या युद्धात इराणच्या बाजूने उतरण्याची तयारी उत्तर कोरियाचे सर्वेसर्वा किम जोंग ऊन यांनी दाखवली आहे. ‘इराणने लष्करी मदत मागितल्यास उत्तर कोरिया इस्रायलविरुद्ध क्षेपणास्त्रे पुरवण्यास तयार आहे. फक्त इराणने सांगावं, आमच्या एका मिसाईलने अख्खा इस्रायल नष्ट करून टाकू,’ असे किम जोंग म्हणाले. ‘उत्तर कोरियाचे अनेक नागरिक इराणमध्ये आहेत. त्यांच्या सुरक्षेसाठी आम्ही कोणाशीही वाटाघाटी करत बसणार नाही. आमच्या एकाही नागरिकाला साधी इजा झाली तरी आम्ही युद्धात उतरण्यास मागेपुढे पाहणार नाही,’ असा थेट इशारा जोंग यांनी अमेरिका व इस्रायलला दिला आहे.

तीन हिंदुस्थानींचा मृत्यू

युद्धात आतापर्यंत तीन हिंदुस्थानी नागरिकांचा मृत्यू झाला आहे, तर 20 जखमी झाले आहेत. ओमानच्या समुद्रात एमकेडी व्योम आणि स्कायलाइट या दोन व्यापारी जहाजांवर इराणने केलेल्या हल्ल्यात तिघांना जीव गमवावा लागला.

असेम्ब्ली ऑफ एक्सपर्ट्सच्या इमारतीवर बॉम्बहल्ला

खामेनी यांच्या उत्तराधिकाऱयाची निवड करण्यासाठी इराणमधील कोम येथे असेम्ब्ली ऑफ एक्सपर्ट्सची बैठक सुरू असतानाच बॉम्बहल्ला झाला. असेम्ब्लीमध्ये 88 सदस्य आहेत. हल्ल्यात किती जणांचा मृत्यू झाला हे कळू शकलेले नाही. दरम्यान, इराणचे नवे संरक्षण मंत्री माजिद इब्र अल रझा यांना पदभार स्वीकारल्यानंतर अवघ्या दोन दिवसांत अमेरिकी हल्ल्यात जीव गमावावा लागला.

Comments are closed.